Marathi Actor Atul Parchure Passes Away : अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी, हिंदी चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेले अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. परचुरे यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यानंतर ते त्यामधून बरे झाल्याचंही वृत्त होतं. पण, सोमवारी त्यांची जीवनज्योत अखेर मालवली. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत.
कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमधील त्यांची भूमिकाही सर्वांच्या लक्षात राहणारी होती. अलिबाबा आणि चाळीशीले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता.
'द कपिल शर्मा' शो या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. कपिल शर्माच्याच 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' या कार्यक्रमात त्यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कॅन्सर काळातील आठवणी सांगितल्या होत्या. चुकीच्या उपचारामुळे कॅन्सर बळावला, अशी माहिती त्यांनी दिली होती.
अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीनं कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभुमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्यांची भूमिका होती. पण, कॅन्सरनंतरची त्यांची इनिंग दुर्दैवानं फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.