Navratri 2025| Surekha Kudachi News: नवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा-अर्चना करताना महिलेला आपले सामर्थ्य जाणवते. प्रत्येक महिलेमध्ये एक दुर्गा असते, कठीण प्रसंगावेळी त्या-त्या महिलेमधील शक्ती संबंधित प्रसंगाविरोधात सामना करते. 'सन मराठी' वाहिनीवरील 'जुळली गाठ गं' या मालिकेतील 'दामिनी मुजुमदार' हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.
...त्या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी सहा महिने लागले: सुरेखा कुडची
अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, "नवरात्री म्हटलं की एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. प्रत्येक महिलेत प्रचंड शक्ती असते. कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचे आणि कुटुंबाचे रक्षण कसे करायचे? हे तिला उत्तमरित्या माहिती असते. स्त्री स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त जगते, त्यामुळे माझा प्रत्येक महिलेला, तिच्यातील सामर्थ्याला सलाम आहे. माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण ज्याने मला नव्याने जगायला शिकवले तो प्रसंग म्हणजे माझ्या पतीचे निधन. त्या क्षणी मी खूप खचून गेले. हातात अडीच वर्षांची मुलगी आणि पतीचं जाणे सहन करणे खूप कठीण होते. प्रत्येक महिलेसाठी पुरुषाचा आधार महत्त्वाचा असतो. मी स्वतःच्या पायावर उभी होते, तरीही सोबतीची उणीव जाणवत होती. त्या प्रसंगातून बाहेर येण्यास मला जवळपास सहा महिने लागले. माझ्या कुटुंबाने त्या काळात खूप आधार दिला. माझ्या बहिणीने सांगितलं, ‘पुन्हा काम करायला सुरुवात कर, आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल.' त्यानंतर मी नव्या जोमाने काम सुरू केलं."
(नक्की वाचा: Priya Marathe News: 'ते रुप कोणी पाहावे अशी तिची इच्छा नव्हती...' प्रिया मराठेचा संघर्ष सांगताना अभिजीत खांडकेकर भावुक)
(नक्की वाचा: Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: बिग बॉस फेम सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं, कोकण हार्टेड गर्ल म्हणाली...)
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या: सुरेखा कुडची
सुरेखा कुडची पुढे असंही म्हणाल्या की, "मी स्वामींना एकच प्रार्थना केली की माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये. पैशाअभावी काही देता आले नाही असे तिला कधी म्हणावं लागू नये, हीच माझी इच्छा होती. आजही तिचं शिक्षण सुरू आहे आणि आमच्यावर स्वामींची कृपा आहे, असं मी मानते. नवरात्रीच्या निमित्ताने मला माझ्या सखी-मैत्रिणींना एवढंच सांगावसं वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहा. किमान स्वतःचा खर्च भागवू शकाल इतकं तरी काम नक्की करा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या."