Suraj Chavan New Home: मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. सूरज चव्हाण 29 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. पुण्यातील पुरंदर येथे धुमधडाक्यात त्याचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आधी करिअर मग लग्न असा प्रत्येकाला हवाहवासा असा प्रवास सूरजचा आतापर्यंत राहिला आहे. डोळे दिपवून टाकणारं यश सूरजने कमी वेळेत गाठलं आहे. मात्र यात एक गोष्ट मिसिंग होती, ती म्हणजे त्याच्या स्वप्नातलं घर. सूरजच्या स्वप्नातल्या घराने देखील आता आकार घेतला आहे. पाहताच क्षणी नजरेत भरेल असं त्याचं घर तयार झालं आहे.
आपलं स्वत:चं टुमदार एखादं घर असावं, असं सूरज चव्हाणला नेहमी वाटायचं. बिग बॉसच्या घरात देखील त्याने त्याच्या घराच्या स्वप्नाबाबत अनेकदा बोलून दाखवलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्यांचं स्वप्नच बाहेर त्याची बाहेर वाट पाहत होतं. बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यानंतर मिळालेल्या रकमेतून सूरजने घर बांधण्याचा निर्णय घेतला होता. सोबतच अनेकांनी त्याला मदतीचा हात देखील पुढे केला होता. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजच्या घराची जबाबदारी घेतली अन् तो निश्चिंत झाला.
सूरज चव्हाणच्या घराचा VIDEO
आता सूरजचे जे घराचं स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात उतरलं आहे. लग्नाच्या काही दिवसआधी सूरजचं घर देखील बांधून तयार आहे. ही भव्य वास्तू सूरजच्या नावाला साजेशी अशीच आहे. सूरजने आज (18 नोव्हेंबर रोजी) नवीन घरात गृह प्रवेश केला आहे. पत्राच्या घरातून दुमजली टोलेजंग घरात प्रवेश करतानाचा आनंद सूरजच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कसं आहे सूरजचं घर?
सूरजने शेअर केलेल्या व्हिडीओ दिसतंय की, प्रशस्त हॉल, मॉड्युलर किचन, मोठ-मोठ्या खोल्या दिसत आहेत. घराचं इंटिरियर देखील आकर्षक आहे. मॉड्युलर किचन, डिझायनर जिना असं सगळं बारीक विचार करून सूरजचं घर उभं राहिलं आहे. सूरजचा हा बंगला त्याची नवी ओळख बनेल यात दुमत नाही. अशारितीने सूरजने पाहिलेली घर आणि लग्न अशी दोन्ही स्वप्न बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लगेचच पूर्ण होत आहेत.
सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव
सूरजच्या नव्या घरासाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकाने लिहिलं की, "गरीब घरातून आलेला एखादा माणूस आयुष्यात जिंकतो. तेव्हा त्याचं यश आपलंही वाटतं. अभिनंदन भाऊ, मनापासून खूप खूप शुभेच्छा." आणखी फॅनने लिहिलं की, "भावा त्या जागी जी एक छोटी रूम होती पत्र्याची ती अजून आठवत आहे. आता जो बंगला आहे ती तुझी मेहनत बोलत आहे. झिरो ते हिरो. शुभेच्छा"