ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Rajesh Khanna alleged girlfriend Anita Advani : दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या कथित गर्लफ्रेंड अनिता अडवाणी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राजेश खन्ना यांच्यासोबतच्या आपल्या नात्याला 'कायदेशीर विवाहा'चा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
२०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या निधनानंतर अनिता अडवाणी चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राजेश खन्ना यांची पत्नी डिंपल कपाडिया, मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. तसेच, राजेश खन्ना यांच्या निधनानंतर आपल्याला त्यांच्या 'आशीर्वाद' बंगल्यातून जबरदस्तीने बाहेर काढण्यात आले, असा दावा करत त्यांनी मालमत्तेवर हक्क मागितला होता. राजेश खन्नापेक्षा २० वर्षांनी लहान असलेली अनिता अडवाणी यांनी राजेश खन्नाने त्यांच्यासोबत गुपचूपपणे लग्न केल्याचाही दावा केला आहे. २०१२ मध्ये खन्ना यांच्या मृत्यूपर्यंत त्या राजेश खन्नासोबत किमान एक दशकभर 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होत्या, असा दावा त्यांनी केला आहे. राजेश खन्नाने त्यांच्या डोक्याला कुंकू लावून त्यांच्याशी 'गुप्तपणे' लग्न केलं होतं, त्यामुळे त्यांच्या नात्याला पत्नीचा दर्जा देण्याची मागणी अनिता अडवाणी यांनी उच्च न्यायालयात केली होती.
न्यायालयाचं काय म्हटलं?
न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी ही अपील फेटाळून लावत दिंडोशी सत्र न्यायालयाचा पूर्वीचा निकाल कायम ठेवला आहे. न्यायालयाने स्पष्ट केलं की, अनिता आणि राजेश खन्ना यांचे नाते 'विवाहासारख्या' कायदेशीर व्याख्येत बसत नाही. त्यामुळे त्यांना राजेश खन्ना यांच्या कायदेशीर पत्नीचा दर्जा दिला जाऊ शकत नाही.
कपाडिया कुटुंबाने दावा फेटाळला...
मात्र, खन्ना यांच्या कायदेशीररित्या विवाहित पत्नी, अभिनेत्री डिंपल कपाडिया, त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना आणि जावई अक्षय कुमार यांनी 'विवाहा'चा हा दावा फेटाळला आहे. कपाडिया कुटुंबाने, खन्ना यांच्याशी 'विवाहित' असल्याच्या किंवा दिवंगत अभिनेत्याच्या 'लिव्ह-इन' पार्टनर असल्याच्या त्यांच्या दाव्यांना विरोध केला आहे. २०१५ मध्येही न्यायालयाने त्यांचे दावे फेटाळले होते. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे डिंपल कपाडिया आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.