National School Of Drama Mumbai: दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था गेल्या ६६ वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील हजारो कलाकारांना प्रशिक्षण देत आहे. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज त्रिपाठी आणि आशुतोष राणा यांसारखे असंख्य प्रसिद्ध कलाकार या संस्थेत शिकले आणि त्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवली आहे. आता लवकरच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा प्रशिक्षण वर्ग मुंबईमध्ये सुरु होत आहे
आतापर्यंत, NSD च्या देशभरातील विविध शहरांमध्ये सहा शाखा होत्या आणि आता त्याची सातवी शाखा मुंबईत उघडली आहे. फिल्म सिटी मुंबईत एक वर्षाचा अभिनय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, ज्याचे शुल्क फक्त १७३ प्रति तास आहे. १२ तासांचे हे वर्ग महिन्याला अंदाजे २० दिवस चालतील, म्हणजेच वार्षिक खर्च अंदाजे ५ लाख असेल.
दिल्लीच्या मुख्य संस्थेत तीन वर्षांचा विस्तृत अभ्यासक्रम चालतो, त्या तुलनेत हा कालावधी कमी वाटू शकतो. मात्र, या एक वर्षाच्या अभ्यासक्रमाचा आवाका मोठा ठेवण्यात आला आहे. दिवसातून १२ तास, महिन्यातून सुमारे २० दिवस चालणाऱ्या या क्लासेसमुळे, संपूर्ण वर्षाचा खर्च अंदाजे ५ लाख रुपये इतका असेल. मात्र, NSD चे संचालक चितरंजन त्रिपाठी यांनी या एक वर्षाच्या कालावधीबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे.
त्यांच्या मते, "आम्ही केवळ १२ तासांचे वर्ग घेत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाचा किडा (अभिनय करण्याची तीव्र इच्छा) जागवतो. एकदा ही प्रेरणा जागृत झाली की, विद्यार्थी संस्थानात असो वा नसो, तो आयुष्यभर आपल्या कलेवर काम करत राहतो." याचाच अर्थ, NSD आता केवळ तांत्रिक शिक्षण देण्याऐवजी, विद्यार्थ्यांमध्ये आत्मप्रेरणा आणि सातत्य निर्माण करण्यावर भर देत आहे.
नक्की वाचा >> 30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल
या शाखेचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासक्रमात झालेला बदल. आतापर्यंत NSD प्रामुख्याने नाटकावर आणि त्याच्या तंत्रावर केंद्रित होते. मात्र, काळाची गरज ओळखून मुंबईतील या शाखेत सिनेमातील अभिनयाच्या तंत्रावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. पूर्वी चित्रपटात काम करू इच्छिणाऱ्या NSDच्या विद्यार्थ्यांना पुण्याच्या FTII मध्ये जाऊन कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागत असे. आता मुंबईतील या केंद्रात ‘लेन्सची इकॉनॉमी' म्हणजेच, कॅमेऱ्यासमोर किती आणि कसे हावभाव द्यावेत याचे विशेष प्रशिक्षण मिळणार आहे.