भारतीय दूरदर्शनच्या इतिहासात रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'आदिपुरुष'च्या अपयशानंतर आता नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम्' या भव्यदिव्य चित्रपटाच्या माध्यमातून रामायण पुन्हा एकदा नव्या रुपात आणि अद्ययावत व्हीएफएक्सच्या (VFX) जोरावर मोठ्या पडद्यावर येत आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर त्याचीच चर्चा सुरू आहे.
तगडी स्टारकास्ट अन् उच्च दर्जाचे VFX
'रामायणम्'च्या ट्रेलरमध्ये बॉलिवूड आणि साऊथच्या दिग्गज कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळत आहे. चित्रपटात रणबीर कपूर (प्रभू श्रीराम), साई पल्लवी (सीता), रवि दुबे (लक्ष्मण), यश (रावण) यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय कुणाल कपूर, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंह, विवेक ओबेरॉय, अजिंक्य देव आणि शोभना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अरुण गोविल यांचे पुनरागमन
90 च्या दशकात मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल या चित्रपटात राजा दशरथाच्या भूमिकेत दिसत आहेत.
श्रीरामांवर रावण भारी! यशच्या अवताराची तुफान चर्चा
टीझरमध्ये रावणाची झलक दिसली नव्हती, मात्र ट्रेलरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या रावण अवताराने चाहत्यांना थक्क केले आहे. ट्रेलरमधील त्याचा डॅशिंग आणि पावरफुल अवतार श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या पात्रांवरही भारी पडताना दिसत आहे.
VIDEO
दिल्लीत पार पडलेल्या ग्रँड ट्रेलर लाँच कार्यक्रमादरम्यान बोलताना यशने सांगितले की, "या एवढ्या मोठ्या पौराणिक प्रोजेक्टचा भाग बनताना मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटामुळे मला हिंदी भाषा शिकण्याची उत्तम संधी मिळाली. या भूमिकेसाठी मी निर्माते नमित मल्होत्रा यांचा आभारी आहे. तसेच रणबीरने या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले असून त्याने स्क्रीनवर जादू निर्माण केली आहे."
2026 आणि 2027 मध्ये दोन भागांत होणार प्रदर्शित
निर्मात्यांच्या नियोजनानुसार 'रामायणम्' हा चित्रपट दोन भागांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पहिला भाग: 2026 च्या अखेरीस प्रदर्शित होईल.
दूसरा भाग: 2027 मध्ये प्रदर्शित केला जाईल.
अत्यंत वास्तववादी व्हीएफएक्स, भव्य सेट आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे 'रामायणम्' भारतीय चित्रपटसृष्टीतील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world