Pankaj Dheer Passes Away : बी.आर. चोप्रा निर्मित महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्णाची भूमिका साकारत घराघरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेता पंकज धीर यांचं निधन झालं आहे. पंकज यांचं निधन बुधवारी (15 ऑक्टोबर) रोजी सकाळी 11.30 वाजता झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कर्करोगाच्या उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
महाभारतात अर्जुनची भूमिका साकारणारे आणि पंकजचे सहअभिनेता फिरोज खान यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे. आपण एक चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तो एक चांगला माणूस होता. मला या वृत्ताचा धक्का बसला आहे.
नक्की वाचा - Actor Raju Talikote Passes Away: शुटिंगदरम्यान हार्ट अटॅक, प्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज यांना कर्करोगाची लागण झाली होती. ते यातून बाहेर आले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कर्करोगाची लागण झाली. यावेळी त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांच्यावर एक सर्जरीही झाली होती. मात्र पंकज यांना वाचवता आलं नाही.
पंकज धीर यांचा जन्म 1956 रोजी मुंबईत झाला. त्यांनी महाभारत, चंद्रकांता या टीव्ही मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. महाभारत या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नागरिकांच्या मनात घर केलं. सध्या त्यांचा मुलगा निकितन धीरदेखील मालिका आणि अभिनय क्षेत्रात आहे. निकितन हा अभिनेत्री कृतिका सेंगर या अभिनेत्रीशी विवाहबंधनात अडकला.