Phule movie released date : चित्रपटातील काही दृश्यांमध्ये वादात अडकलेला 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी 11 एप्रिल रोजी 'फुले' चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राम्हण मुलगा सावित्रीबाई फुलेंवर शेण फेकताना दाखविण्यात आला होता. यावर ब्राम्हण महासंघाकडून आक्षेप घेण्यात आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी यासंदर्भात आंदोलनं करण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अखेर फुले चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वत: दिग्दर्शक अनंथ महादेवन यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. येत्या 25 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे.
नक्की वाचा - Phule Movie 'मी स्वतः ब्राह्मण, माझ्याएवढा स्ट्राँग...' फुले चित्रपटावर दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अनंथ महादेवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी तर सावित्रीबाईंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा राव यांनी साकारली आहे. प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा, अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे यांनी फुले चित्रपटाची निर्मिती केली आहे.