Pranit More Biryani Controversy: स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे सध्या त्याच्या एका शोमधील 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादावरून अडचणीत सापडला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या कथित अश्लील आणि आक्षेपार्ह मजकुराप्रकरणी महाराष्ट्र सायबरने स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा, डॉ. सेजल पवार आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या प्रकारामुळे अडचणीत आलेल्या प्रणीतचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत प्रणीतसोबत भारतीय क्रिकेटचा तरुण सुपरस्टार वैभव सूर्यवंशी दिसतोय. अश्लील आणि पातळीहीन व्हिडिओसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रणीतनं वैभवला नेमकी कशी वागणूक दिली? याचं निरिक्षण नेटिझन्स करत आहेत.
काय आहे व्हिडिओ?
प्रणीत मोरेच्या शोमध्ये भारताचा स्टार बॅटर वैभव सूर्यवंशी पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. स्टेजवरून प्रणीतने सांगितले की, वैभव त्याला सोशल मीडियावर फॉलो करतो आणि वर्ल्ड कप फायनलपूर्वी वैभवने स्वतः मेसेज करून या शोमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर प्रणीतने आपल्या खास शैलीत वैभवला सांगितले की, अरे तू तर पाकिस्तानी क्रिकेटर्सची मैदानावर क्लास घेतोस, आता माझा क्लास घेऊ नकोस. हे ऐकून संपूर्ण ऑडिटोरियममध्ये हशा पिकला आणि वैभव सूर्यवंशीही लाजताना दिसला.
इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई आणि बिहारी पॅटर्न
शो दरम्यान प्रणीत मोरेने वैभव सूर्यवंशीच्या अंडर 19 मधील एका वादळी इनिंगचा आवर्जून उल्लेख केला. वैभवने अवघ्या 80 बॉलमध्ये 175 रन कुटले होते, याचा संदर्भ देत प्रणीतने इंग्लंडच्या बॉलर्सना ट्रोल केलं. वैभवच्या या तुफानी बॅटिंगचे कौतुक करताना प्रणीतने 'एक बिहारी, सब पर भारी' असा डायलॉग मारला, ज्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
( नक्की वाचा : Weight Loss: 101 किलोवरून थेट 65 वर; 7 महिन्यांत 36 किलो वजन कमी करण्याचं तरुणीनं सांगितलं गुपित )
बाबर आझमची उडवली खिल्ली
वैभव सूर्यवंशीने काही दिवसांपूर्वीच 'कॉम्प्लान' ब्रँडची एक जाहिरात केली होती. याचा संदर्भ देत प्रणीतने पाकिस्तानचा बॅटर बाबर आझमवर एक जबरी टोला लगावला. प्रणीत म्हणाला की, आता देशातील तरुण खेळाडूंना वाटेल की चांगली बॅटिंग करण्यासाठी कॉम्प्लान पिणे गरजेचे आहे. यानंतर बाबर आझमचे नाव घेत तो म्हणाला की, कॉम्प्लान पिल्याने बाबरची हाईट तर वाढली, पण त्याचा स्ट्राईक रेट मात्र वाढू शकला नाही. प्रणीतच्या या पंचलाईनवर उपस्थित प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
नेमका काय आहे प्रणीत मोरेचा बिर्याणी वाद
प्रणीत मोरेच्या आधीच्या एका शोमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये एका प्रेक्षकाने आपल्या डेटिंगचा अनुभव सांगताना महिलांविषयी अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या संभाषणात 370 रुपयांच्या बिर्याणीचा उल्लेख होता. त्या प्रेक्षकाच्या महिला विरोधी वक्तव्यावर प्रणीत मोरे स्टेजवर मोठ्याने हसताना दिसला होता. यावरून सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त झाला आणि महिलांचा अनादर करणाऱ्या अशा वक्तव्यांवर कॉमेडियनने हसण्याऐवजी त्याला तिथेच रोखायला हवे होते, अशी टीका प्रणीतवर सुरू झाली.
हा वाद संपूर्ण देशभरात वाढल्यानंतर प्रणीत मोरेने जाहीर माफी मागितली. त्याने मान्य केले की, त्या प्रेक्षकाला तिथेच थांबवणे ही माझी जबाबदारी होती आणि ती माझ्याकडून चुकली. प्रणीतने तो वादग्रस्त व्हिडिओ देखील डिलीट केला, मात्र तरीही सोशल मीडियावरील युजर्सचा राग शांत झाला नाही. सतत होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून प्रणीत मोरेने त्याचे तब्बल 38 लाख फॉलोअर्स असलेले मुख्य इन्स्टाग्राम अकाऊंट डिएक्टिव्हेट म्हणजेच बंद केले आहे. त्याचे दुसरे छोटे अकाऊंट सुरू असले, तरी मुख्य अकाऊंट बंद झाल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पाहा संपूर्ण व्हिडिओ