Allu Arjun Story फ्लॉवर नाही फायर ! लाजरा मुलगा कसा बनला सर्वात मोठा 'स्टायलिश स्टार'

Allu Arjun Story : तेलुगु भाषेत चित्रित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाची संपूर्ण देशभरात क्रेझ आहे. अगदी बिहारची राजधानी पाटणामध्ये या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा खास कार्यक्रम करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 4 mins

हे आंटे अमलापुरम, आह आधी आहापुरम
ई आंटे, इच्छापुरम, ईला कोटी लागुतारु आंध्र जनम

दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या तेलुगु गाण्यानं अक्षरश: वेड लावलं होतं. एकही तेलुगु शब्द माहिती नसलेल्या तरुणांनाही हे गाणं पाठ झालं होतं. या गाण्यात बेभान नाचणारा एक तरुण सर्वांच्या घरोघरी पोहोचला. राकट, डॅशिंग आणि माचो अभिनेत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तेलुगु चित्रपट सृष्टीत हा लाजरा आणि चिकना चुपडा हिरो कोण आला? हा प्रश्न अनेकांना पडला होता. तो हिरो होता अल्लू अर्जुन. आज दोन दशकांनी 'फ्लॉवर नही फायर' या डायलॉगनं संपूर्ण देशाचा स्टार झालेला 'पुष्पा'. तेलुगु भाषेत चित्रित झालेल्या पुष्पा 2 चित्रपटाची संपूर्ण देशभरात क्रेझ आहे. अगदी बिहारची राजधानी पाटणामध्ये या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चिंगचा खास कार्यक्रम करण्यात आला होता. पाटणामध्येही 'स्टायलिश स्टार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी बिहारी फॅन्सनी मोठी गर्दी केली होती.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रक्तात सिनेमा

अल्लू अर्जुनचं कुटुंब चित्रपटाशी संबंधित आहे. त्याचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांचे वडील अल्लू अरविंद हे दिग्गज निर्माते आणि वितरक होते. अल्लू अर्जुन त्यांचा दुसरा मुलगा. अल्लू अर्जुनचा मोठा भाऊ अल्लू व्यंकटेश व्यावसायिक आहे. तर त्याचा लहान भाऊ अल्लू सिरीष देखील तेलुगु इंडस्ट्रीमध्ये अभिनेता म्हणून सक्रीय आहे. 

Advertisement

तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी अल्लू अर्जुनच्या आत्याचा नवरा आहे. तर अभिनेता रामचरण त्याचा आत्तेभाऊ आहे. चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध असूनही अल्लू अर्जुनला या इंडस्ट्रीमध्ये संघर्ष करावा लागलाय.

Advertisement

( नक्की वाचा : 'पुष्पा 2' चित्रपटाचा नवा रेकॉर्ड; तिकिटाची किंमत चक्क 3000च्या घरात! )

'आर्या' नं दिला मोठा ब्रेक

अल्लू अर्जुनचा जन्म 8 एप्रिल 1982 रोजी चेन्नईत झाला. चेन्नईत बारावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर त्यानं हैदराबादमध्ये बीबीएचं शिक्षण पूर्ण केलं. बालकलाकार म्हणून काही सिनेमामध्ये काम केल्यानंतर गंगोत्री (2003) हा मुख्य सिनेमा. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. पण, या सिनेमानंतर आपला आत्मविश्वास शून्यापासून मायनस 100 पर्यंत घसरला होता. असं अल्लूनं काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आज 'स्टायलिश स्टार'  म्हणून सर्व फॅन्सना वेड लावणाऱ्य़ा अल्लू अर्जुनला तेव्हा खराब लुकमुळे चित्रपट मिळत नव्हते. 

Advertisement

अल्लू अर्जुनची भेट दिग्दर्शक सुकुमारशी झाली आणि त्याला कारकिर्दीमधील सर्वात मोठा ब्रेक मिळाला. या चित्रपटाच्या यशानं त्याला मोठा ब्रेक दिला. 'आ आंटे' गाण्यातील अफलातून डान्समुळे त्याची आंध्र प्रदेशच्या बाहेरही ओळख निर्माण झाली. त्यामधूनच 'स्टायलिश स्टार' ही पदवी त्याला मिळाली. आज ती अल्लू अर्जुनची ओळख बनलीय.

अल्लू अर्जुननं आर्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सिनेमात काम केलंय. बन्नी , देसमुदुरु, परुगु , वेदम, सर्राइनाडू, अला वैकुंठपुरमुलू  हे त्याचे चित्रपट चांगलेच गाजले. या सिनेमातील त्याच्या अभिनयासोबतच लुक आणि डान्स देखील चांगलाच लोकप्रिय झाला. सिनेमातील भूमिकेनुसार लुक आणि केसांचा रंग बदलण्याची अल्लू अर्जुनची स्टाईल आहे.

कोव्हिड काळात वाढली लोकप्रियता

'पुष्पा' सिमेमामुळे अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण  देशभरात शिगेला पोहोचली. या सिनेमानं अनेक विक्रम केले. फक्त तेलुगु किंवा दाक्षिणात्य भाषेत नाही तर हिंदी आणि भोजपुरीमधील डब झालेला पुष्पा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. 

कोरोना काळात सारं जग घरामध्ये अडकलं होतं. त्याच काळात मनोरंजनासाठी लोकं ओटीटीकडं वळाली. ओटीटीच्या माध्यमातून दाक्षिणात्य सिनेमे घरोघरी पोहचले. त्याचा मोठा फायदा अल्लू अर्जुनला झाला. त्याचा लुक, डान्सची चर्चा होऊ लागली. त्याची कॉपी करणारे असंख्य रिल्स व्हायरल झाले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरही अल्लू अर्जुनचा मोठा फॅन आहे. वॉर्नरनंही अल्लूच्या गाण्यांवर खास व्हिडिओ तयार केले आहेत. 

अल्लू अर्जुनची संपत्ती किती?

अल्लू अर्जुन उद्योजक म्हणूनही चांगलीाच लोकप्रिय आहे. मीडिया रिपोर्टनुसार तो सुमारे 460 कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे. लग्झरी लाईफस्टाईलची आवड असलेल्या अल्लूकडं प्रायव्हेट जेट, अलिशान बंगला, तसंच अनेक महागड्या प्रॉपर्टी आहेत. अल्लूला कारची विशेष आवड असून त्याचं स्वत:चं कारचं कलेक्शन आहे.  Rolls Royce सारखी महागडी कारही अल्लूच्या कलेक्शनमध्ये आहे.

अल्लूनं 2022 मध्ये स्वत:चा अल्लू स्टुडिओ (Allu Studio) सुरु केलाय. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची गीता आर्टस (Geeta Arts) ही वितरण कंपनी देखील आहे. अल्लूनं हैदराबादमधील अमीरपेटमध्ये स्वत:चं मल्टिप्लेक्स देखील सुरु केलंय. या व्यवसायाचा अन्य राज्यांमध्ये विस्तार करण्याची त्याची योजना आहे.
 

Topics mentioned in this article