Radha Patil News: पंढरपूर येथील कार्यक्रमात झालेल्या राड्यावर लावणी कलाकार आणि बिग बॉस फेम राधा पाटील हिने पहिल्यांदा जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. NDTV Marathiच्या नारीशक्ती या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये राधा पाटीलने एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देत या वादावर, तिच्या लावणी सादरीकरणार आणि खासगी आयुष्याबाबत मनमोकळेपणे भाष्य केले.
पंढरपूरचा राडा आणि राधाची पहिली प्रतिक्रिया | Radha Patil Pandharpur Rada Reaction
पंढरपूर येथील कार्यक्रमात झालेल्या गोंधळाबद्दल बोलताना राधा पाटील म्हणाली की, प्रेक्षकांचे खूप प्रेम असते. पण कार्यक्रमांमध्ये गर्दी खूप जास्त असल्याने आणि पब्लिक दूर असल्याने लोकांना स्टेजपर्यंत येणे शक्य होत नाही. अशा वेळी फोटो काढता आला नाही की काही लोकांची चिडचिड होते. यातूनच खुर्ची फेकून मारणे किंवा धक्काबुक्की होण्याचे प्रकार घडतात. पंढरपूरच्या दिवशीही असेच काहीसे झाले. त्या दिवशी तिथे मोठा राडा झाला आणि आम्हाला त्याचा खूप त्रास सहन करावा लागला. आम्ही आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये होतो. परिस्थिती इतकी बिघडली की आमची व्हॅनिटी थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावी लागली. त्यानंतर तिथून उतरून आम्ही आमच्या गाडीने बाहेर पडलो.
नक्की वाचा: NDTV Marathi Manch: 'भारतीय टेनिसपटूंना संधी अन् मदतीची गरज', गोल्डन गर्ल ऋतुजा भोसले थेट बोलल्या
बिग बॉसमुळे मिळालेली ओळख आणि लावणीवरून होणारी टीका | Bigg Boss Fame and Lavani Controversy
राधा पाटीलने सांगितले की, बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मला खूप मोठी ओळख मिळाली. आमच्या लावणीची पद्धत थोडी वेगळी असली, तरी लोकांना ती आवडते म्हणूनच आज आम्हाला कामं मिळत आहेत. जर लोकांना आमची कला आवडली नसती, तर आम्हाला कोणी कामं दिलीच नसती. लावणीत सुधारणा करायची असती, तर लोकांनी आम्हाला बोलावणे बंद केले असते. माझा कार्यक्रम अश्लील नक्कीच नाही. लोकांना जे पाहायला आवडते, तेच मी सादर करते आणि म्हणूनच आज माझे नाव होत आहे.
लहानपणापासूनच डान्स करणे ही माझी आवड होती, त्यासाठी मी कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नाही, असे राधाने स्पष्ट केले. वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या शोमध्ये जाऊन तिथल्या मुलींना पाहून मी डान्स शिकले. इयत्ता 12 वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझे कोल्हापूर, पुणे अशा शहरांमध्ये जाणे वाढले. तिथे माझे नाव होऊ लागल्यानंतर तरुणांनी मला पाठिंबा दिला आणि मी स्वतःचे स्वतंत्र कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. पुण्यात दोन मैत्रिणी आणि एका भावाला सोबत घेऊन मी पहिला दहीहंडीचा शो केला होता, त्यानंतर पुढील शो मिळत गेले.
(नक्की वाचा : NDTV Marathi Manch : AI मुळे नोकऱ्या धोक्यात ते कामाचे तास... रमा किर्लोस्कर यांचं रोखठोक मत)
आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना राधा म्हणाली की, मी सध्या पूर्णपणे सिंगल आहे. माझ्या भूतकाळात काय घडले होते, हे मी बिग बॉसच्या घरात असतानाच सर्वांना सांगितले आहे. मला आता असा जोडीदार हवा आहे, जो मला पूर्णपणे सपोर्ट करेल. लावणीवरून लोकांनी मला आजवर जी काही नावे ठेवली किंवा जे काही बोलले, ते सर्व स्वीकारण्याची तयारी असलेल्या मुलासोबत मला राहायला आवडेल.
चाहत्यांचे वेडेपण आणि धक्कादायक प्रसंग | Crazy Fans and Dangerous Incidents
कार्यक्रमादरम्यान चाहत्यांच्या येणाऱ्या अनुभवांबद्दल तिने काही आठवणी सांगितल्या. एका शोमध्ये काही महिला आल्या आणि मला बिग बॉसमध्ये पाहिल्याचे सांगून रडू लागल्या. तेव्हा मलाही रडू आलं, त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. महिला वर्गही माझ्यासाठी इतका वेडा आहे, हे पाहून मला आनंद होतो. पण एका मुलाने फोटो मिळाला नाही म्हणून स्वतःचा हात कापून घेतला होता, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशा प्रकारांमुळे कलाकारांना विनाकारण नाव ठेवले जाते. मी त्या मुलाला व्हॅनिटीमध्ये बोलावून समजावले की फोटो कुठेही मिळेल, असे टोकाचे पाऊल उचलत जाऊ नका.
लावणीकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन | Changing Audience Perspective on Lavani
आजकाल प्रेक्षकांना पूर्वीसारखी पारंपरिक लावणी पाहण्याची इच्छा राहिलेली नाही, असा दावा राधाने केला. ती म्हणाली की, "मी अनेकदा साध्या पद्धतीने पारंपारिक लावणी करून पाहिली, पण समोरून टाळ्या किंवा वन्समोअर येत नाही. जर समोरचे प्रेक्षकच सादरीकरण एन्जॉय करत नसतील, तर मी एकटीनेच बदल करून काय फायदा? माझी खूप चांगली मैत्रीण हिंदवी पाटील ही लावणी करताना कधी पदरही खाली करत नाही, पण आज तिला खूप कमी कार्यक्रम मिळतात. माझा संपूर्ण शो लावणीचा नसतो, मी फक्त चार लावण्या करते आणि बाकी मॅशअप गाण्यांवर डान्स करते. लोकांना जे आवडते तेच आम्ही करणार"
मोठ्या पडद्यावर पदार्पण आणि आगामी सिनेमा | Debut on Big Screen and Future Plans
पुढच्या पाच वर्षांत स्वतःला कुठे पाहते, या प्रश्नावर राधा पाटीलने चाहत्यांना एक मोठी गुड न्यूज दिली. ती लवकरच मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. तिच्या या नवीन सिनेमात अनेक मोठे कलाकार असणार आहेत. या चित्रपटाचे अधिकृत चित्रीकरण येत्या 17 जूनपासून सुरू होणार असल्याचे तिने सांगितले.
राधा पाटील NDTV मराठी 'मंच'वर LIVE | NDTV Marathi Manch LIVE | Marathi News