Rajesh Khanna last days: बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्ना यांच्या निधनाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 जुलै 2012 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न झाल्यानंतर काही काळाने ते दोघे वेगळे राहू लागले होते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांची कथित गर्लफ्रेंड अनिता आडवाणी ही त्यांच्यासोबत होती. अनिताने एका मुलाखतीत त्यांच्या शेवटच्या दिवसांतील अत्यंत भावनिक आणि धक्कादायक आठवणींना उजाळा दिला आहे.
स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले
अनिताने एका जुन्या मुलाखतीत सांगितले की, आयुष्याच्या शेवटच्या 1 वर्षामध्ये राजेश खन्ना यांची तब्येत प्रचंड बिघडली होती. त्यांनी स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मृत्यूसाठी तयार केले होते. अनिताच्या म्हणण्यानुसार, ते एका वर्षामध्येच प्रचंड खचले आणि अशक्त झाले होते. त्यांची ती अवस्था तिच्या बघवत नव्हती. ते दिवसभर रडत असायचे आणि त्यांनी स्वतःच आपल्या मृत्यूला बोलावले होते. जेव्हा कधी ते नकारात्मक बोलायचे, तेव्हा अनिता त्यांच्याशी वाद घालायची जेणेकरून त्यांनी जगण्याची उमेद सोडू नये.
'आशीर्वाद' बंगला म्युझियम बनवण्याचे स्वप्न
राजेश खन्ना यांचा मुंबईतील प्रसिद्ध 'आशीर्वाद' बंगला ही त्यांची सर्वात लाडकी वास्तू होती. जेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती, तेव्हा या बंगल्यासाठी त्यांना 150 कोटी रुपयांची ऑफर आली होती. मात्र, त्यांनी तो बंगला विकण्यास स्पष्ट नकार दिला. हा बंगला 100 वर्षे टिकावा आणि त्याचे रूपांतर एका भव्य म्युझियममध्ये व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर जेव्हा हा बंगला पाडण्यात आला, तेव्हा आपलाही एक भाग संपला, अशी भावना अनिताने व्यक्त केली.
( नक्की वाचा : फार्महाऊसमध्ये 17 महिने गाडले गेले होते 6 जीव; राजेश खन्ना यांच्या अभिनेत्रीच्या हत्येची चटका लावणारी कहाणी )
शेवटच्या काळात कुटुंबाची साथ
अभिनेत्याच्या निधनाच्या साधारण 1 वर्ष आधीपासून त्यांची पत्नी डिंपल कपाडिया आणि दोन्ही मुली, ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या त्यांना नियमितपणे भेटायला येत असत. त्या घरात काही तास घालवायच्या. जेव्हा कुटुंब यायचे, तेव्हा अनिता त्यांची काळजी घ्यायची आणि त्यांना राजेश खन्ना यांच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे सांगायची.
डिंपल कपाडिया यांच्याशीही तिचे मित्रासारखे संबंध होते आणि प्रकृती खालावत चालल्यामुळे औषधोपचाराच्या बाबतीत ती कुटुंबाचा सल्ला घ्यायची. राजेश खन्ना यांची माजी गर्लफ्रेंड अंजू महेंद्रू ही देखील कधीकधी त्यांच्यासोबत येऊन बसायची.
( नक्की वाचा : Aishwarya Rai: सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? इतक्या वर्षांनी उघड झालं 'ते' भयानक सत्य )
अनिताने सांगितले की, राजेश खन्ना खूपच अशक्त झाले होते आणि डॉक्टरांनी आधीच कल्पना दिली होती की ते कधीही जगाचा निरोप घेऊ शकतात. त्यांच्या आजारपणामुळे आणि एकटेपणामुळे शेवटचे दिवस अत्यंत वेदनादायी होते. या सुपरस्टारच्या शेवटच्या प्रवासात कुटुंबाने आणि जुन्या मित्रांनी एकत्र येऊन त्यांना सांभाळले, पण त्यांचे स्वप्न असलेला बंगला मात्र वाचवता आला नाही.