जाहिरात

फार्महाऊसमध्ये 17 महिने गाडले गेले होते 6 जीव; राजेश खन्ना यांच्या अभिनेत्रीच्या हत्येची चटका लावणारी कहाणी

Laila Khan Murder Case: बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका अभिनेत्रीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अस्तित्व अवघ्या एका रात्रीत संपवले जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल.

फार्महाऊसमध्ये 17 महिने गाडले गेले होते 6 जीव; राजेश खन्ना यांच्या अभिनेत्रीच्या हत्येची चटका लावणारी कहाणी
Laila Khan Murder Case: लैला खानने 'वफा: ए डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होते.
मुंबई:

Laila Khan Murder Case: बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका अभिनेत्रीसह तिच्या संपूर्ण कुटुंबाचे अस्तित्व अवघ्या एका रात्रीत संपवले जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नसेल. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील 5 सदस्यांची झालेली निर्घृण हत्या हे  देशातील एक भीषण हत्याकांड आहे.  तब्बल 17 महिने एका फार्महाऊसच्या जमिनीखाली गाडला गेलेला हा भयानक कट जेव्हा समोर आला, तेव्हा संपूर्ण देश हादरला होता. आता या घटनेला 15 वर्ष उलटल्यानंतरही पोलीस या प्रकरणातील काही आरोपींचा शोध घेत आहेत. 

एका रात्रीत गायब झाले संपूर्ण कुटुंब

हे संपूर्ण प्रकरण 2011 साली घडले. लैला खान ही बॉलिवूड अभिनेत्री मुंबईतील ओशिवरा भागात राहात होती. लैला तिची आई सेलिना आणि तिच्या कुटुंबातील इतर 4 सदस्य  अचानक बेपत्ता झाले. लैला खानने 2008 मध्ये आलेल्या 'वफा: ए डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होते. संपूर्ण कुटुंब अचानक गायब झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर लैलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

संशयाची सुई कुणावर?

मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी अंबादास पोते यांनी या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. तपासादरम्यान पोलिसांना लैलाच्या मुंबईतील घरातून तिच्या सावत्र वडिलांचे म्हणजेच परवेझ ताकचे ओळखपत्र सापडले. परवेझ ताक हा सेलिनाचा तिसरा पती होता. लैलाचे चित्रपटात काम करणे परवेझला मान्य नव्हते, तसेच कुटुंबातील मालमत्तेवरून त्यांच्यात सतत वाद होत होते. परवेझने लैलाला कामासाठी दुबईला जाण्याचा सल्ला दिला होता, जो तिने फेटाळला. याच रागातून परवेझने संपूर्ण कुटुंबाचा काटा काढण्याचा कट रचला.

(नक्की वाचा : एड्समुळे झाला 35 वर्षांच्या अभिनेत्रीचा मृत्यू, 10 वर्ष होती गायब आणि बेघर, कुटुंबीयांपासून तोडलं होतं नातं )
 

फार्महाऊसवरील ती पार्टी ठरली शेवटची

परवेझने आधीच इगतपुरी येथील कुटुंबाच्या फार्महाऊसवर आपल्या एका ओळखीच्या माणसाला सुरक्षारक्षक म्हणून ठेवले होते. त्यानंतर त्याने संपूर्ण कुटुंबाला तिथे काही दिवस सुट्ट्या घालवण्यासाठी तयार केले. फार्महाऊसवर पोहोचल्यावर सर्वांनी एकत्र जेवण केले, डान्स केला आणि सर्वजण झोपायला गेले. मध्यरात्री परवेझ आणि त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉड आणि सुऱ्याने संपूर्ण कुटुंबावर हल्ला केला. लैलाचा भाऊ इम्रान याने कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण नराधम परवेझने सर्वांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे न ठेवण्यासाठी परवेझने अत्यंत थंड डोक्याने नियोजन केले होते. फार्महाऊसवर स्विमिंग पूलसाठी खोदण्यात आलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्याने सर्व 6 मृतदेह गाडले. आधी 3 मृतदेह खाली ठेवून त्यावर गाद्या आणि उशा टाकल्या, त्यानंतर उर्वरित 3 मृतदेह ठेवून खड्डा मातीने बुजवून टाकला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने कुटुंबाची एक गाडी थेट जम्मूमध्ये नेऊन सोडली होती. अखेर पोलिसांनी त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने अटक केली.

( नक्की वाचा : Aishwarya Rai: सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? इतक्या वर्षांनी उघड झालं 'ते' भयानक सत्य )

17 महिन्यांनी उघड झाले हत्याकांड

अटकेनंतर परवेझने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस जेव्हा इगतपुरीच्या फार्महाऊसवर पोहोचले, तेव्हा पावसाने खड्ड्यावरील माती थोडी खचली होती. पोलिसांनी सलग 6 तास उत्खनन केल्यानंतर तिथून मानवी सांगाडे बाहेर आले. वैद्यकीय तपासणीत ते लैला आणि तिच्या कुटुंबाचे असल्याचे स्पष्ट झाले. तब्बल 17 महिने हा नरसंहार जगापासून लपून राहिला होता. तत्कालीन सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय यांनी परवेझ ताक अत्यंत चतुर आणि धोकादायक गुन्हेगार असल्याचे म्हटले होते.

न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

 मुंबई सत्र न्यायालयाने 2024 मध्ये या प्रकरणातील निकाल दिला. न्यायालयाने या प्रकरणाला 'दुर्मिळातील दुर्मिळ' मानून मुख्य आरोपी परवेझ ताक याला फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने म्हटले की, हा कृत्य अत्यंत क्रूर आणि समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला धक्का देणारे होते. इतकी मोठी सामूहिक हत्या करून 17 महिने पुरावे लपवून ठेवणे हे आरोपीच्या थंड डोक्याने केलेल्या नियोजनाचे लक्षण होते. या प्रकरणात परवेझला मदत करणारा त्याचा साथीदार मात्र अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com