- रमेश चंदने यांनी मराठी चित्रपटसृष्टीत फोर्स आणि झपाटलेला 2 चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या
- सात वर्षांपासून काम न मिळाल्यामुळे रमेश चंदने रिक्षाचालक म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत
- हॉस्टेल चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करून पुढे विविध सिनेमांमध्ये त्यांना संधी मिळाली होती
चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार संघर्ष करतात. त्यानंतर काही जण या क्षेत्रात स्थिरावतात. तर काही जण स्थिरावल्यानंतर ही बाहेर फेकले जातात. त्यांच्या नावावर हीट चित्रपटांची नोंद असते. पण असं काही होतं की नंतर त्यांना काम मिळणं ही कठीण होतं. अशा वेळी करायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर असतो. याचाच प्रत्यय मराठी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याला येत आहे. 'फोर्स' आणि 'झपाटलेला 2' यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला सध्या काम मिळेना झालं आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षापासून त्याला रिक्षा चालवावी लागत आहे.
या अभिनेत्याचे नाव आहे रमेश चंदने. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना रिक्षा चालवावी लागत आहे. त्यांना पडद्यावर चांगली प्रसिद्धी मिळाली. पण त्या क्षेत्रात ते स्थिरावू शकले नाहीत. शेवटी त्यांना रिक्षाचे हँडलने आधार दिला. रमेश चंदने यांना कॉलेज जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे चित्रपट सृष्टीतच काम करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. तसे त्यांनी प्रयत्न ही केले. संघर्ष केला. शेवटी त्यांना 'हॉस्टेल' या चित्रपटात पहिली मोठी संधी मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. त्यांचं काम प्रेक्षकांना आवडलं.
त्यामुळेच त्यांना पुढची काम मिळत गेली. त्यांना पुढे 'फोर्स', 'सिक्रेट ऑफ गावस्कर' आणि महेश कोठारे यांच्या 'झपाटलेला 2' या चित्रपटांमध्ये संधी मिळाली. या चित्रपटात ही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. म्हणून त्यांना पुढे 'मटका किंग' वेबसिरीजमध्ये ही महत्वाची भूमीका करण्याची संधी मिळाली. मात्र असं असलं तरी त्यांच्याकडे येणाऱ्या कामांचा ओघ हळूहळू कमी झाला. कमी म्हणजे काम मिळणचं बंद झालं. त्याच वेळी लग्न ही झालं. जबाबदारी वाढली. मुलं झाली. अशा वेळी त्याचं शिक्षण, संसार याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. मग त्यांनी एक निर्णय घेतला.
जगण्यासाठी पैसे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी तात्पुरता पर्याय म्हणून रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. परंतु, ही तात्पुरती व्यवस्था आता त्यांच्या आयुष्याची 7 वर्षांची वास्तविकता बनली आहे. इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांना मदतीची पोकळ आश्वासने दिली होती. तर काहींनी चक्क 'फायनान्सर' शोधून आणण्याची अट घातली होती. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, रिक्षा चालवण्यावरून काही लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली आहे. पण त्यांनी हिंम्मत हरली नाही. एका मालिकेत त्यांना रिक्षा चालकाचीच भूमीका मिळाली. मी मूळचा रंगभूमीचा कलाकार आहे. अभिनय हेच माझे पहिले प्रेम आहे, मला केवळ रिक्षाचालकाच्या पलीकडच्या भूमिका मिळाव्यात," अशी प्रांजळ अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.