Sachin Pilgaonkar Breaks Silence on Social Media Trolling: मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सतत चर्चेत राहिले आहेत. विशेषतः त्यांच्या काही जुन्या मुलाखतींमधील वक्तव्यांमुळे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या ट्रोलिंगवर आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी आपली मते मांडली होती, मात्र स्वतः सचिन पिळगावकर यावर काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती.
अखेर त्यांनी एका मुलाखतीमध्ये या सर्व प्रकरणावर सडेतोड आणि तितक्याच खिलाडूवृत्तीने उत्तर दिले आहे. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सचा समाचार घेण्याऐवजी त्यांना चक्क आशीर्वादच दिले आहेत.
काय म्हणाला सचिन?
स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलताना सचिनने स्पष्ट केले की, सध्याचा काळ असा आहे जिथे प्रत्येकाला आपले शब्द तोलून मापून वापरावे लागतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण लोकांच्या अटींवर आपले आयुष्य जगावे. तो म्हणतो की, प्रेक्षकांना एखाद्या कलाकाराचे काम किंवा सिनेमा आवडला नाही तर ते सांगण्याचा त्यांना नक्कीच हक्क आहे.
मात्र, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा अधिकार कोणालाही नाही. आम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत नाही, त्यामुळे लोकांनीही आपली मर्यादा ओळखावी, असे मत त्याने व्यक्त केले. अशा गोष्टींकडे जास्त लक्ष दिले तर आपलाच वेळ वाया जाईल, असेही तो पुढे म्हणाला.
( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )
ट्रोलिंगकडे बघण्याचा सचिनचा दृष्टिकोन
या मुलाखतीत सचिनने अभिनेता शाहरुख खानच्या एका जुन्या उत्तराचा संदर्भ दिला. शाहरुखला जेव्हा ट्रोलिंगबद्दल विचारले होते, तेव्हा त्याने म्हटले होते की, जर माझ्यावर टीका केल्यामुळे एखाद्या रिकाम्या माणसाला रात्री शांत झोप लागत असेल, तर मला त्याचा आनंदच आहे. हीच वृत्ती सचिननेही स्वीकारल्याचे दिसते.
तो म्हणतो की, ज्या लोकांनी आयुष्यात काही मोठे केले नाही, ते मला ट्रोल करून स्वतःला मोठे समजत असतील तर समजू दे. त्यांच्या सुखाचे कारण जर मी असेल, तर मला त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही.
( नक्की वाचा : K-Pop Industry: दिवसाला 18 तास काम आणि जेवणावर निर्बंध, के-पॉप इंडस्ट्रीचा हा काळा चेहरा तुम्हाला माहित आहे? )
65 वर्षांची करकीर्द
सचिन पिळगावकरने एक मजेशीर मुद्दा मांडला की, 31 डिसेंबरला तो आपल्या करिअरची 65 वर्षे पूर्ण करत आहे. करिअरच्या या टप्प्यावर असतानाही जर तरुण पिढी त्याला इतके महत्त्व देत असेल आणि तो सोशल मीडियावर चर्चेत असेल, तर ही त्याच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे.
सचिनने मिश्किलपणे सांगितले की, या ट्रोलिंगमुळे आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे त्याला आता अनेक मोठ्या जाहिरातींच्या (ॲड्स) ऑफर्स मिळत आहेत. नकारात्मकता बाजूला सारून या सगळ्यातून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा, हे त्याने आपल्या उत्तराने दाखवून दिले आहे.
ट्रोल करणाऱ्या मुलांना खास आशीर्वाद
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सचिनने ट्रोल करणाऱ्या तरुणांवर राग न धरता त्यांना प्रेमाने समज दिली आहे. अनेकदा ट्रोलिंग करणाऱ्या मुलांना सचिनचे नेमके वय माहीत नसते आणि ते त्याला आपल्याच वयाचा समजून कमेंट्स करतात. याकडे एक 'कॉम्प्लिमेंट' म्हणून पाहतो, असं सचिन म्हणाला. त्यानं सांगितलं की, ही सगळी माझी मुलेच आहेत आणि मी त्यांना मनापासून आशीर्वाद देतो. पण त्यांनी आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर दुसऱ्याच्या नावावर चर्चा करण्यापेक्षा स्वतःच्या नावावर काहीतरी करून दाखवावे, असा मोलाचा सल्लाही त्याने या निमित्ताने दिला आहे.