Sameer Wankhede vs Shahrukh khan : ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाखरुख खानचा मुलगा आर्यन खान गजाआड गेला अन् संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी समीर वानखेडे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या झोनल डायरेक्टर पदावर कार्यरत होते. आर्यन जेलमध्ये गेल्यानंतर वानखेडे आणि किंग खान यांच्यात मोठं शीतयुद्ध रंगलं होतं. परंतु, आता पुन्हा एकदा खान आणि वानखेडे यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आयआरएस अधिकारी (भारतीय महसूल सेवा) समीर वानखेडे यांनी बाड्स ऑफ बॉलिवूड या ओटीटी शो विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीचं असलेल्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटफ्लिक्स (Netflix) कंपनीवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की, बाड्स ऑफ बॉलिवूड(Bads of Bollywood) या ओटीटी शोमध्ये बदनामी झाल्याचं वानखेडे यांचं म्हणणं आहे. या शोमुळे अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची नकारात्मक प्रतिमा तयार झालीय. त्यामुळे लोकांचा कायदा अंमलबजावणी संस्थावरील विश्वास कमी झाला आहे, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. तसच याचिकेत असंही म्हटलंय की, या बाड्स ऑफ बॉलिवूड या मालिकेची निर्मिती वानखेडे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आलीय. समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्यांशी संबंधीत प्रकरण मुंबई हायकोर्टात आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात प्रलंबित आहे. असं असतानाही बाड्स ऑफ बॉलिवूड शो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला,असंही याचिकेत नमूद करण्यात आलंय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाड्स ऑफ बॉलिवूड या मालिकेतील एका सीनमध्ये असं दाखवण्यात आलंय की, सत्यमेव जयते हा राष्ट्रीय चिन्हाचा भाग आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका पात्राने याबाबत अश्लील हावभाव केल्याचंही या सीनच्या माध्यमातून समोर आलंय. यामुळे प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 च्या तरतुदींचे उल्लंघन झालं आहे. यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
दरम्यान, बाड्स ऑफ बॉलिवूड या मालिकेचा आशय माहिती तंत्रज्ञान कायदा (Information Technology Act) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध तरतुदींच्या विरोधात आहे. या शो मध्ये अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेटच्या माध्यमातून देशातील नागरिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे. तसच अब्रुनुकसानी झाल्याचा दावा करत 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी दान केली जाईल,असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.