Shakti Kapoor Fake Death News: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर सध्या त्यांच्या एका सोशल मीडिया व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. मनोरंजन विश्वात सेलिब्रिटींच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरवणे ही एक गंभीर समस्या बनली असून, यावेळी शक्ती कपूर या अफवांचे बळी ठरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाची खोटी बातमी वेगाने पसरत होती. यामुळे त्यांचे चाहते आणि कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर 73 वर्षांच्या शक्ती कपूर यांनी स्वतः समोर येत या अफवा पसरवणाऱ्यांचा कडक शब्दात समाचार घेतला आहे.
काय म्हणाले शक्ती कपूर?
शक्ती कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून आपण सुखरूप असल्याचे स्पष्ट केले आहे. या व्हिडिओमध्ये ते शांत पण कठोर आवाजात बोलताना दिसत आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, हॅलो एव्हरीवन, माझ्या मृत्यूची बातमी पूर्णपणे फेक आहे. मी हेल्दी आहे आणि हॅपी आहे. कृपया अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करा. अशा चुकीच्या बातम्या पसरवणे ही चांगली गोष्ट नाही, कारण यामुळे संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या परिवाराला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या अफवांना थारा देऊ नका, असे आवाहन त्यांनी आपल्या चाहत्यांना केले आहे.
( नक्की वाचा : Raja Shivaji चित्रपटाने उलगडले इतिहासातील विसरलेले पान; कोण होते शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे? )
सायबर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा
शक्ती कपूर यांनी केवळ स्पष्टीकरण देऊन हा विषय थांबवलेला नाही. अशा प्रकारच्या खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध आपण कायदेशीर तक्रार करणार असल्याचे त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शक्ती कपूर यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
100 हून अधिक चित्रपटांचा प्रदीर्घ प्रवास
शक्ती कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत अनुभवी कलाकार आहेत. 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. खलनायकी भूमिका असो वा विनोदी पात्र, त्यांनी प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः असरानी आणि कादर खान यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड गाजली होती. या तिघांनी मिळून 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. शक्ती कपूर अलीकडेच मेरे हसबंड की बीवी या चित्रपटात दिसले होते, जिथे त्यांच्या अभिनयाचे पुन्हा एकदा कौतुक झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world