Actor Rajesh Sharma health update: चित्रपटसृष्टीतून अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रभास यांच्या 'फौजी' या आगामी चित्रपटाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा यांना एका विषारी कीटकाने डंख मारल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर राजेश शर्मा यांची प्रकृती कमालीची बिघडली असून, ते अजूनही धोक्याबाहेर नसल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन' (AICWA) ही संघटना आक्रमक झाली असून, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेमकं काय घडलं?
अभिनेत्री सुदीपा चटर्जी यांनी राजेश शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये 'फौजी' चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. शूटिंगचे पॅकअप झाल्यानंतर राजेश शर्मा हे सेटवरील स्थानिक तंत्रज्ञांशी गप्पा मारत उभे होते. हा परिसर दाट झाडीचा होता आणि त्याच वेळी त्यांना एका विषारी कीटकाने किंवा कोळ्याने डंख मारला.
कीटक चावल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत चालली होती, तरीही त्यांनी हैदराबादवरून कोलकातासाठी विमान पकडले. या प्रवासादरम्यान त्यांना प्रचंड ताप आला, ते अस्वस्थ झाले आणि त्यांची तब्येत आणखी खालावली. कोलकात्याला पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना तातडीने ढाकुरिया येथील मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
( नक्की वाचा : Aishwarya Rai: सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर कशी होती ऐश्वर्याची अवस्था? इतक्या वर्षांनी उघड झालं 'ते' भयानक सत्य )
रुग्णालयात भरती करून 1 दिवसापेक्षा जास्त वेळ झाला असूनही त्यांना अजूनही तीव्र ताप आहे, श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि त्यांच्या उजव्या पायातील इन्फेक्शन वेगाने पसरत आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
चित्रपट संघटनेचे सरकारला साकडे
या घटनेची गंभीर दखल घेत 'AICWA' चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्याकडे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संघटनेने निर्मात्यांवर आणि मॅनेजमेंटवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्यांनी विचारले आहे की, राजेश शर्मा यांची तब्येत सेटवरच इतकी बिघडली होती, तर निर्मात्यांनी त्यांना हैदराबादमधील एखाद्या चांगल्या रुग्णालयात तातडीने का दाखल केले नाही? सेटवर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या का? कामाच्या ठिकाणी पाळले जाणारे आरोग्य आणि सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का? शूटिंगच्या ठिकाणी नक्की काय घडले की त्यांची प्रकृती इतकी खालावली?
निर्मात्यांनी सर्व खर्च उचलावा
संघटनेने स्पष्ट केले आहे की, चित्रपट कितीही मोठ्या बजेटचा किंवा कितीही मोठ्या स्टारचा असला, तरी तिथे काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार आणि कामगाराला सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण देणे ही निर्मात्यांची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी आहे. या प्रकरणात जर कोणाचा निष्काळजीपणा समोर आला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच राजेश शर्मा यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च संबंधित चित्रपट निर्मात्यांनीच उचलला पाहिजे, अशी मागणीही संघटनेने केली आहे.
Date: 08 July 2026
— All Indian Cine Workers Association (@aicwaofficial) July 8, 2026
PRESS STATEMENT
AICWA Demands High-Level Investigation into the Sudden Illness of Actor Rajesh Sharma During the Shooting of Prabhas' Upcoming Film Fauji at Ramoji Film City, Hyderabad
The All Indian Cine Workers Association (AICWA) expresses deep concern… pic.twitter.com/osBW9ro8PM
राजेश शर्मा यांचा सिनेसृष्टीतील प्रवास
राजेश शर्मा हे हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'खोसला का घोसला', 'नो वन किल्ड जेसिका', 'चिल्लर पार्टी', 'इश्किया', 'स्पेशल 26' आणि 'एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. ते नुकतेच अक्षय कुमार यांच्या 'भूत बंगला' या चित्रपटात पाहायला मिळाले होते. सध्या त्यांचे फॅन्स आणि संपूर्ण चित्रपटविश्व ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world