Smriti Irani Highest Paid Actress: 'क्युंकी सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्री स्मृती इराणी यांनी तब्बल एक दशकाहून अधिक काळानंतर पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात दमदार पुनरागमन केले आहे. त्यांचं 'कमबॅक' केवळ अभिनयापुरतं मर्यादित नसून, मानधनाच्या बाबतीतही एक विक्रम ठरला आहे. स्मृती इराणी आता एका एपिसोडसाठी तब्बल 14 लाख रुपये मानधन घेत आहेत, ज्यामुळे त्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री ठरल्या आहेत.
स्मृती इराणी यांनी 'क्यूंकी सास भी कभी बहू थी 2' या मालिकेच्या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा 'तुलसी विराणी' ही त्यांची लोकप्रिय भूमिका साकारली आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड 29 जुलै रोजी स्टार प्लस आणि जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिक्वेलमध्ये एकूण 150 एपिसोड्स असणार आहेत.
जर स्मृती इराणी एका एपिसोडसाठी 14 लाख मानधन घेत असतील, तर त्यांना या मालिकेसाठी एकूण 21 कोटी मिळणार आहेत. यामुळे त्या केवळ या मालिकेतीलच नव्हे, तर भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री ठरणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मालिका जेव्हा 2000 साली सुरू झाली, तेव्हा स्मृती इराणींना प्रति एपिसोड फक्त 1,800 मिळत होते. मालिकेच्या वाढत्या लोकप्रियतेनुसार, त्यांचे मानधन 8,000, नंतर 35,000 आणि शेवटी 50,000 रुपयांपर्यंत वाढले होते.
इतर लोकप्रिय अभिनेत्यांचं मानधन
'अनुपमा' फेम अभिनेक्षी रुपाली गांगुली प्रति एपिसोड 3 लाख मानधन घेतात. तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'जेठालाल' म्हणजेच दिलीप जोशी प्रति एपिसोड सुमारे 1.5 लाख कमावतात.जेनिफर विंगेट, तेजस्वी प्रकाश, श्रद्धा आर्या, हर्षद चोपडा आणि हिना खान यांसारख्या लोकप्रिय कलाकारांचे मानधन प्रति एपिसोड 1.5 लाख ते 3 लाख दरम्यान आहे.