कोरोना व्हायरसच्या काळात बेघर कामगारांना मदत केल्यानं अभिनेता सोनू सूदची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. त्याचा याच लोकप्रियतेता फायदा उठवण्यासाठी सोनूला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदासह राज्यसभा खासदार पदाची ऑफर देण्यात आली होती. त्यानं स्वत:च या गोष्टीचा गौप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर आपण या सर्व ऑफर नाकारल्याचं त्यानं सांगितलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. मी ती ऑफर नाकारल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला. ती देशातील खूप मोठी लोकं होती. त्यांनी मला राज्यसभेची खासदारकी देखील ऑफर केली होती. तुला राजकारणात कशासाठीही झगडावं लागणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं होतं,' सोनूनं बॉम्बे ह्यूमन्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही गोष्ट उघड केलीय.
शक्तीशाली लोकं तुम्हाला भेटतात. तुम्हाला जग बदलण्यासाठी प्रोत्सहान देतात, हा सर्व रोमांचकारी अनुभव असतो, असं सोनूनं या मुलाखतीमध्ये सांगितलं. पण, मला स्वातंत्र्य गमावयचं नव्हतं त्यामुळे मी या सर्व ऑफर नाकारल्या असं सोनू म्हणाला.
'लोकं राजकारणात पैसे कमावणे किंवा सत्ता मिळवणे या दोन गोष्टींसाठी प्रवेश करतात. मला या दोन्ही गोष्टीमध्ये रस नव्हता. लोकांना मदत करण्याचा विषय असेल तर मी ती यापूर्वी करत होतो. मला त्यासाठी कुणालाही विचारावं लागत नाही. मला जर आणखी लोकांना मदत करायची असेल तर मी ती स्वबळावर करेन. मला माझे स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटते,' असं सोनूनं स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : नीतू कपूरनं केलं आलिया भटकडे दुर्लक्ष, 'ती' आई म्हणून हाक मारत होती पण..Video Viral )
कदाचित आणखी काही वर्षांनी...
'मला अनेकांनी सांगितलं की राजकारणात प्रवेश केला तर मला दिल्लीमध्ये मोठ्या पोस्टसह अलिशान बंगला मिळेल. माझ्यासाठी कडेकोट सुरक्षा असेल. तसंच सरकारी स्टॅम्प असलेलं लेटरहेड देखील मिळेल. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण, मी आज त्यासाठी तयार नाही. कदाचित आणखी काही वर्षांनी मला वेगळं वाटू शकेल. मी त्याबाबत कधीही काही सांगू शकत नाही.
पण, मला आजही वाटतं माझ्यामध्ये अजूनही कलाकार आणि दिग्दर्शक दडलाय. मी राजकारणाच्या विरुद्ध नाही. मी राजकीय नेत्यांचा आदर करतो. माझे काही मित्र राजकारणात आहेत आणि ते चांगलं काम करत आहेत,' असं तो म्हणाला.
सोनू सूदची बहीण मालविका सुदनं 2022 साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी मोगा विधानसभा मतदारसंघातून निवडणुकही लढवली. पण आम आदमी पक्षाच्या अमनदीप कौर अरोरा यांनी त्यांचा पराभव केला.