Dasavatar: मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर

कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

'दशावतार' चित्रपटाचं पोस्टर, त्याचा पहिला लूक आणि चित्रपटातील पहिलंच गाणं  “आवशीचो घो” यांनी आधीच रसिकांच्या मनात तुफान उत्सुकता निर्माण केला आहे. प्रेक्षकांची ही उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच ‘दशावतार' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर एका शानदार समारंभात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेला ‘दशावतार' चित्रपट मराठी चित्रसृष्टीत एक नवी झळाळी घेऊन अवतरत आहे.  महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचं महत्त्व सर्वाधिक आहे. या गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात दशावतार ही कलापरंपरा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच येत्या गणेशोत्सवाच्या पाठोपाठ अवघ्या महाराष्ट्रात ‘दशावतार‘ चं मोठ्या दिमाखात आगमन होत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज असलेला हा मल्टीस्टारर ‘दशावतार ‘ येत्या 12 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 

‘दशावतार ‘ मध्ये नेमकं आहे तरी काय, याची सर्वांनाच उत्कंठा आहे. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने , तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार ‘! कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार! कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट म्हणजे ‘दशावतार ‘ आहे. अर्थपूर्ण कथा, दमदार अभिनय आणि कर्णमधूर संगीत यांचा अप्रतिम संगम म्हणजेच हा ‘दशावतार'. असा हा कलात्मक आणि तांत्रिक दृष्ट्या भव्य अनुभूती देणारा ‘दशावतार ‘ येत्या 12 सप्टेंबरला प्रदर्शीत होत आहे. 

नक्की वाचा - Top 10 movies: जुलै महिन्यातील टॉप 10 चित्रपटांची यादी आली समोर, 'सैयारा' कितव्या क्रमांकावर?

‘तुझ्यात जीव रंगला', ‘ भागो मोहन प्यारे', ‘माझा होशील ना', सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी' अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस ‘ सारख्या लोकप्रिय चित्रपटाचे  लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा - पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. गुरू ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केले आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. निर्माते, दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले की, आपल्या मातीतल्या माणसांची, निसर्गाची, परंपरेची आणि इथल्या भावनांची ही गोष्ट आहे. जी भाषेच्या सीमा ओलांडून सगळ्या जगाला आपलीशी वाटू शकेल. कारण या कथेतला निसर्ग, रूढी परंपरा, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे फक्त कोकण किंवा महाराष्ट्रापुरते नाहीत, ते जगभरात कमी अधिक फरकाने सारखेच आहेत.

नक्की वाचा - Gautami Patil: गौतमीच्या अदा अन् सोनाली सोनावणेच्या आवाजाची जादू; 'राणी एक नंबर' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ‘दशावतार' चित्रपटाची मला भावलेली गोष्ट म्हणजे याच्या निर्मिती प्रक्रियेत असलेली पूर्ण टीम ही ताज्या दमाची आणि नव्या विचारांची आहे. एक अनोखा उत्साह या संपूर्ण टीममध्ये आहे. चित्रपट माध्यमाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या सर्वांचा आहे आणि त्याची झलक ट्रेलरमधून बघायला मिळतेय. अशा नव्या फळीसोबत काम करणे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे हे झी स्टुडिओजचं कर्तव्य आहे असं मी मानतो. याचवर्षी आम्ही केलेला ‘ आता थांबायचं नाय' हा चित्रपट पण अशाच आजच्या पिढीने बनवलेला होता ज्याला तुम्ही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अगदी तसाच प्रतिसाद आणि प्रेम ‘दशावतार' या चित्रपटाला सुद्धा मिळेल अशी मला खात्री आहे.