Actress Priya Marathe Death: राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगाने निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी प्रियाने जगाचा निरोप घेतला. या बातमीने मराठीसह हिंदी सिनेविश्वही हादरुन गेले आहे. प्रिया मराठेच्या निधनानंतर सिनेविश्वात हळहळ व्यक्त होत असून अनेक कलाकारांनी भावुक पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता सुबोध भावेची भावुक पोस्ट!
प्रिया मराठे " एक उत्तम अभिनेत्री, काही मालिका आणि चित्रपटात माझी सहकलाकार. पण माझ्यासाठी त्याही पेक्षा महत्त्वाच नातं तिच्या बरोबर होतं. प्रिया माझी चुलत बहीण. या क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत,कामावरची तिची श्रद्धा या गोष्टी खूप कौतुकास्पद होत्या.प्रत्येक भूमिका तिने अतिशय मनापासून आणि समरस होऊन साकारली, अशी भावुक पोस्ट करत अभिनेता सुबोध भावेने हळहळ व्यक्त केली आहे.
"काही वर्षांपूर्वी तिला कॅन्सर च निदान झालं. त्याच्याशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली. नाटक, मालिका या मधून पुन्हा आपल्या सहज सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांसमोर गेली. पण त्या कॅन्सर ने काही तिची पाठ सोडली नाही. " तू भेटशी नव्याने " या आमच्या मालिकेदरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला. या संपूर्ण प्रवासात तिचा जोडीदार शंतनू मोघे भक्कमपणे तिच्याबरोबर होता. माझी बहीण लढवय्या होती, पण अखेर तिची ताकद कमी पडली. प्रिया तूला भावपूर्ण श्रद्धांजली" असंही सुबोध भावेने म्हटलं आहे.
मानसी नाईकला शोक अनावर..
खरतर मला आत्ताच बातमी मिळाली. प्रिया मैत्रिण म्हणून माझ्यासाठी खूप खास, वेगळी होती. माझी पहिली मालिका चार दिवस सासूचे मधी मला गोड मैत्रिण लाभली होती. मला आत्ता काय प्रतिक्रिया देऊ, खरचं समजत नाही. ती खूप गोड आहे, माझ्यासाठी कायम असेल. असं म्हणत अभिनेत्री मानसी नाईकनेही प्रिया मराठेच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
खासदार अमोल कोल्हे हळहळले!
प्रख्यात अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत 'गोदावरी' तर 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत 'रायबाघन' या भूमिका जिवंत केल्या. प्रिया मराठे या हिंदी मालिकांमध्येही कार्यरत होत्या. त्यांनी 'पवित्र रिश्ता', 'साथ निभाना साथीयॉं' या मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरल्या. त्या गेल्या वर्षांपासून कर्करोगाशी झुंजत होत्या. परंतु ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे त्यांचे पती शंतनु आणि परिवाराला झालेल्या असीम दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी भावुक पोस्ट खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केली आहे.