Maadhavi Nimkar Social Media Video : 'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि खलनायिका (Marathi Actress Maadhavi Nimkar) म्हणून उत्तम काम करणारी माधवी निमकर तिच्या अभिनयाबरोबरच फिटनेससाठीही ओळखली जाते. माधवी नियमित व्यायाम, योगा करते. त्यामुळे चाळीशीतही तिचं सौंदर्य पाहून कौतुक वाटतं.
माधवी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यायामासंबंधित टिप्सही शेअर करीत असते. दरम्यान अभिजात मराठी ओटीटी या फेसबुक अकाऊंटवरुन माधवीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने केरसुणीने योग्य पद्धतीने कचरा कसा काढावा याबद्दल सूचना देताना दिसत आहे.
कचरा कसा काढावा, माधवी देतेय ट्रेनिंग
या व्हिडिओमध्ये माधवी केरसुणीने कचरा कसा काढायला हवा याची माहिती देत आहे. कमरेत वाकून कचरा काढायला हवा. यामुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो. यावेळी माधवी स्वत: हातात केरसुणी घेऊन कचरा काढताना दिसत आहे. यावेळी तिने आपल्या गावातील एका मावशीचा किस्साही सांगितला. गावातील एक मावशी उभं राहून कमरेत न वाकता कचरा काढायची, यामुळे आजी तिच्यावर खूप चिडायची असं माधवी सांगते. कमरेत वाकून कचरा काढण्याचे फायदे माधवीने या व्हिडिओमध्ये दिले आहेत.
नेटकरी मात्र रागावले...
कचरा कसा काढावा याबद्दल माहिती देताना नेटकरी मात्र अभिनेत्रीवर भलतेच चिडले आहेत. त्याचं झालं असं की माहिती देत असताना माधवीने केरसुणी फेकली. बोलत असताना केरसुणी दूर ठेवण्याच्या दृष्टीने तिने ती बाजूला केली असावी. मात्र त्यामुळे नेटकरी माधवीवर भलतेच संतापले. केरसुणी किंवा झाडू हे लक्ष्मीचं रुप असतं ती अशी फेकू नये. माधवीच्या महत्त्वाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करीत नेटकरी मात्र स्वत:च्या सूचना देत असल्याचं दिसत आहे.