दामिनी चित्रपटातील अभिनेता सनी देओल याचा 'ढाई किलो का हाथ'वाला संवाद 90 च्या दशकातील लोकांना जितका परिचित आहे तितकाच तो आजच्या पिढीच्याही परिचयाचा आहे. सनी देओलने स्वत:ची ओळख ही हीमॅन धर्मेंद्र यांचा मुलगा इतक्यापुरती मर्यादीत न ठेवता आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळे वलय निर्माण केले आहे. सनी देओलने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा पीळदार शरीराच्या या हिरोच्या रांगड्या सौंदर्यावर देशातील असंख्य तरुणी फिदा झाल्या होत्या. अॅक्शन हिरो म्हणून सनी देओलने स्वत:ला प्रस्थापित केले. चॉकलेट हिरोंच्या चित्रपटांच्या जमान्यात सनी देओल हा आपल्या अॅक्शन चित्रपटांनी धूमाकूळ घालत होता. सनी, त्रिदेव,चालबाज , घायल, दामिनी,डर,गदर सारखे सनी देओलचे चित्रपट उत्तम चालले. सनी देओल हा असंख्य तरूणींसाठी क्रश बनला होता. या तरुणींमध्ये एका प्रसिद्ध गायिकेचाही समावेश आहे. याची कबुली स्वत: या गायिकेने दिली आहे.
सनी देओल पाहताच क्षणी गायिकेला आवडला होता
rakeshmishra_0 या इन्स्टाग्राम हँडलवर गायिका सुनिधी चौहानचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.एका कार्यक्रमाचा हा व्हिडीओ असून यात सनी देओल, धर्मेंद्र , प्रीतम यासारखी मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमात बोलताना सुनिधी चौहानने जाहीरपणे सांगितलं होतं की सनी देओल तिला प्रचंड आवडत होता. तिने सांगितलं की, बेताब पाहिल्यानंतर सनी देओल हा माझा क्रश झाला होता. सनी देओल यांचे डोळे आणि साईड प्रोफाईल पाहून हजारो तरुणी फिदा झाल्या होत्या, त्यामध्ये मी देखील होते. आजही तुम्ही माझे क्रश आहात असे सुनिधीने म्हटलं होतं. हे ऐकून सनी देओल हे काहीसे लाजले होते. सुनिधीने दिलेली कबुली ऐकून सनी देओल यांचे वडील आणि अभिनेते धर्मेंद्र यांनाही हसू आवरता आलं नाही. सुनिधीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी लाईक केला आहे.
बेताबमुळे रातरात मिळाली प्रसिद्धी
1983 साली प्रसिद्ध झालेल्या बेताब चित्रपटामध्ये सनी देओल आणि अमृता सिंह हे प्रमुख भूमिकेत होते. 5 ऑगस्ट 1983 साली प्रसिद्ध झालेला हा चित्रपट हिट झाला होता. या चित्रपटातील 'जब हम जवां होंगे', 'तुमने दी आवाज लो मैं आ गया' सारखी गाणी सुपरहिट झाली होती. या चित्रपटात सनी देओलने रोमँटीक हिरोची भूमिका साकारली होती. रोमँटीक, अॅक्शन,कॉमेडी चित्रपटांमध्ये सनी देओलने काम केले असून त्याचा गदर 2 हा काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेला चित्रपट पहिल्या भागापेक्षा जास्त हिट झाला होता.