Suraj Chavan to be Wife AI Photo: 'बिग बॉस मराठी 5' चा विजेता सुरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिने सुरजच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या फोटोतील तरुणीचा चेहरा अंकिताने इमोजीने झाकला होता, पण आता याच फोटोवर आधारित 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) च्या मदतीने तयार केलेला एक फोटो व्हायरल झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
हे एआय (AI) फोटो @kadam_legal_services_k या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमुळे 'मिस्ट्री गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा कसा असेल, याचा अंदाज चाहत्यांना आला आहे.
लग्नाची चर्चा आणि मिस्ट्री गर्ल
अंकिता वालावलकर नुकतीच सुरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले. अंकिताच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एका तरुणीसोबतच्या फोटोला 'सुरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट' असे कॅप्शन दिले होते. तिने या फोटोतील तरुणीचा चेहरा इमोजीने लपवल्यामुळे ती नेमकी कोण आहे, हे स्पष्ट झाले नव्हते.
यापूर्वी, 19 सप्टेंबर रोजी सुरजने स्वतः ‘मिस्ट्री गर्ल'सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये दोघेही 'पुष्पा' सिनेमातील 'श्रीवल्ली' डायलॉगवर दक्षिण भारतीय पेहरावात दिसत होते. पण सुरजनेही आपल्या खऱ्या आयुष्यातील श्रीवल्लीचा चेहरा दाखवणे टाळले होते, ज्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्याबद्दलची उत्सुकता अजूनही कायम आहे.
अनाथ मुलीसोबत लग्नाची इच्छा
'बिग बॉस'च्या घरात असताना सुरजने अनेकदा आपल्या प्रेमभंगाबद्दल सांगितले होते आणि त्याला कशी मुलगी हवी आहे, याचेही वर्णन केले होते. विशेष म्हणजे, एकाकीपणा अनुभवल्यानंतर तो एका अनाथ मुलीसोबत लग्न करणार असल्याचेही त्याने म्हटले होते. आता अंकिताच्या माहितीनुसार, सुरजला त्याची जोडीदार भेटली आहे, पण त्यांचे लग्न कधी होणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना अजून थोडी वाट पाहावी लागेल.