गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय हिंदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' नेहमीच चर्चेत असते. या मालिकेतील जेठालालपासून ते टप्पू पर्यंतचे सर्व कलाकार आजही आपल्या व्यक्तिरेखांच्या नावाने ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील दोन लोकप्रिय कलाकार – बबिता (मुनमुन दत्ता) आणि टप्पू (भव्य गांधी) यांच्याबद्दल एक मोठी अफवा पसरली होती.
अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि अभिनेता भव्य गांधी यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. या अफवांना त्यांच्या काही व्हायरल झालेल्या फोटोंनी आणि दोघांमधील 10 वर्षांच्या वयाच्या फरकाने अधिकच हवा दिली होती. या चर्चांवर आता अभिनेता भव्य गांधीने स्वतः मौन सोडले असून, या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
भव्य गांधीचे स्पष्टीकरण
हिंदी रशशी बोलताना भव्य गांधीने या अफवांवर प्रतिक्रिया दिली. त्याने स्पष्ट केले की, “पहिली गोष्ट म्हणजे, ते ज्या टप्पूबाबत बोलत आहेत, तो मी नाहीये. दुसरी गोष्ट, ही अफवा बडोद्यातून पसरली होती. त्यामुळे माझ्या आईला आणि मला याबाबत खूप फोन आले. मी स्पष्ट सांगू इच्छितो की, मी 'टप्पू'ची भूमिका केली, पण मी तो व्यक्ती नाही."
भव्यने सांगितले की, एका व्यक्तीने थेट त्याच्या आईला फोन करून विचारले की, 'तुमच्या मुलाचा साखरपुडा होत आहे.' हे ऐकून त्याच्या आईला राग आला आणि तिने त्या व्यक्तीला 'तुम्हाला अक्कल आहे की नाही?' असे सुनावले. भव्यने स्पष्ट केले की, हे सर्व खूप अचानक झाले आणि ही निव्वळ अफवा आहे. ही बातमी कुठून पसरली, याची त्याला कल्पना नाही.
मुनमुन दत्ता ही मोठी बहीण
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भव्य गांधीने स्पष्ट केले की तो मुनमुन दत्ताला आपली मोठी बहीण मानतो आणि तिच्याकडून त्याने आयुष्यात आणि अभिनयात खूप काही शिकले आहे. या स्पष्टीकरणामुळे सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोण आहे भव्य गांधी?
भव्य गांधीने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत 2008 पासून काम करायला सुरुवात केली होती आणि 2017 मध्ये त्याने शो सोडला. शोमध्ये परत येण्याबद्दल विचारले असता, त्याने सांगितले की, 'होय, मला या शोमध्ये परत यायला नक्कीच आवडेल. टप्पूची भूमिका मिळवण्यासाठी 500 मुलांनी ऑडिशन दिले होते आणि मी त्यापैकी एक होतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी या शोचा एक भाग होतो. टप्पू माझ्या आयुष्यातील आणि अभिनय प्रवासातील एक महत्त्वाचा भाग राहील.