The Family Man 3 Review: प्राइम व्हिडीओवरील बहुचर्चित आणि सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक असलेल्या 'द फॅमिली मॅन 3' अखेर प्रदर्शित झाली आहे. मनोज बाजपेयी यांचा श्रीकांत तिवारी पुन्हा एकदा नव्या मिशनवर निघाला आहे, पण यावेळी त्याच्यासमोर आव्हान आहे जयदीप अहलावतने साकारलेल्या 'रुक्मा' या खतरनाक खलनायकाचे.
2019 मध्ये या सिरीजचा पहिला भाग आणि 2021 मध्ये दुसरा भाग (ज्यात समंथा रुथ प्रभूने नकारात्मक भूमिका केली होती) प्रचंड गाजला होता. एकूण 19 भागांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सिरीजच्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, राज आणि डीके (Raj & DK) या दिग्दर्शक-लेखक जोडीने प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती करण्यात काहीशी कसर सोडल्याचे जाणवते.
'भल्लालदेव' दारू विकू लागला, खंब्यासाठी मोजावे लागतील 5 ते 7 हजार रुपये
'द फॅमिली मॅन 3'ची कथा!
या तिसऱ्या पर्वात श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज बाजपेयीला 'वॉन्टेड' दाखवले आहे. यापूर्वी 'टायगर' किंवा 'स्पायडरमॅन' सारख्या फ्रेंचायझीमध्ये मुख्य पात्र असे 'वॉन्टेड' झालेले आपण पाहिले आहे, तोच परिचयाचा ढाचा इथेही वापरण्यात आला आहे. श्रीकांतवर हे संकट नेमके कसे कोसळते, याची उत्तरे सिरीजमध्ये मिळतील, पण त्याला अडचणीत आणण्याचे मुख्य काम रुक्मा (जयदीप अहलावत) करतो.
कथानक यावेळी नागालँडमधील कोहिमा शहरात आणि संपूर्ण ईशान्येकडील भागात स्थलांतरित झाले आहे. ईशान्य भारताचा भूभाग आणि तेथील पार्श्वभूमी प्रभावीपणे कथानकात गुंफण्याचा प्रयत्न निश्चितच चांगला झाला आहे, परंतु संपूर्ण कथा खूप ताणली गेल्याचे जाणवते.
सर्वात जास्त निराशाजनक भाग म्हणजे श्रीकांत तिवारीच्या कुटुंबाची कथा. पहिल्या दोन भागांमध्ये श्रीकांतच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनाचा संघर्ष खुबीने दाखवण्यात आला होता, पण तिसऱ्या भागात कुटुंबाचा ट्रॅक बोर करतो आणि तो अनावश्यक वाटतो.
सिरीज का पाहू नये?
सिरीज केवळ सात भागांमध्ये आटोपती घेण्यात आली आहे. इतक्या कमी भागांमध्ये कथानकाचा निवाडा करण्याऐवजी, एकतर सिरीज लांबवायला हवी होती किंवा कथेवर अधिक ठोस काम करणे आवश्यक होते. सिरीजच्या समाप्तीकडे पाहिल्यावर, 'चौथ्या सीझनसाठी मसाला वाचवून ठेवला', असे दिग्दर्शकाचे मत असावे, असे स्पष्ट जाणवते. मात्र, यामुळे हा सीझन एका निष्कर्षरहित टप्प्यावर संपतो, जे प्रेक्षकांसाठी निराशाजनक आहे.
नक्की वाचा: सत्य घटनांवर आधारीत आहे 'धुरंधर', रिलीजनंतर पाकिस्तानची आणखी लाज जाण्याची शक्यता
सिरीज का पाहावी?
अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, मनोज बाजपेयीने श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत नेहमीप्रमाणेच दमदार काम केले आहे. त्याचा नैसर्गिक आणि सहज अभिनय भाव खाऊन जातो. इतर कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. मात्र, या संपूर्ण सिरीजचा खरा 'शो स्टॉपर' ठरला आहे तो म्हणजे जयदीप अहलावत. त्याने साकारलेला 'रुक्मा' हा खलनायक अत्यंत प्रभावी आहे. जयदीप अहलावतचा अभिनय इतका बेजोड आहे की, तो संपूर्ण सिरीज आपल्या नावावर करून जातो. रुक्माचे पात्र प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील.
ईशान्य भारताचे सौंदर्य आणि श्रीकांत तिवारीचा नेहमीचा सहज आणि हसतमुख स्वभाव हे या सिरीजचे जमेची बाजू आहेत. मात्र, कथानकातील नवेपणीचा अभाव आणि 'पाताल लोक' सिरीजचा अनुभव देणारा ईशान्येचा सेट (कारण त्या सिरीजमध्येही जयदीप अहलावत होता) यामुळे थोडीशी पुनरावृत्ती वाटते. एकूणच, जयदीप अहलावतचा अप्रतिम अभिनय आणि मनोज बाजपेयीची सहजता हेच या सिरीजचे आधारस्तंभ आहेत. कमकुवत कथानक आणि असमाधानकारक शेवट यामुळे सिरीजचा दर्जा खाली येतो. 'फॅमिली मॅन' सिरीजचे कट्टर चाहते असाल तर, जयदीप अहलावतसाठी नक्कीच एकदा बघा.