गायक आतिफ अस्लमची (Atif Aslam) जादू जगभर आहे. या गायकाने बॉलिवूडमध्येही अनेक अप्रतिम गाणी गायली जी आजही लोक मोठ्या आवडीने ऐकतात. आतिफ अस्लमचं कोणतंही गाणं रिलीज झाल्यानंतर ते सोशल मीडियावर लोकप्रिय झालेलं नाही, असं गाणं सापडणं कठीण. परंतू आतिफसाठी संगीत क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणे सोपे नव्हते. यासाठी त्याने खूप संघर्ष केला आहे. सुपरस्टार होण्यापूर्वी आतिफ रेस्टॉरंटमध्ये गाणं म्हणत होता. रेस्टॉरंटमध्ये गाण्याचे कार्यक्रम करूनच त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.रेस्टॉरंटमध्ये गाण्यापासून ते सुपरस्टार होण्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत.
गाण्याची सुरुवात अशी झाली
आतिफचा जन्म 12 मार्च 1983 रोजी पाकिस्तानातील वजीराबाद येथील एका पंजाबी मुस्लीम कुटुंबात झाला. लहानपणी आतिफला गाण्यात अजिबात रस नव्हता. त्यापेक्षा त्याला क्रिकेटमध्ये जास्त रस होता. परंतू संगीतात अजिबात रस नसलेला मुलगा एक दिवस संगीत क्षेत्रातील सुपरस्टार होईल याचा कोणी विचारही केला नसेल. आतिफच्या गाण्याच्या करिअरची सुरुवात एका रेस्टॉरंटमधून झाली. आतिफने आपल्या मित्राला त्या रेस्टॉरंटमध्ये गाताना पाहिलं होतं. त्यानंतर त्यालाही गाणं म्हणावंसं वाटू लागलं. मग तो एका तरुण संगीतकाराला भेटला आणि त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये गाण्याचे कार्यक्रम सुरू केले. काही काळानंतर दोघांनी मिळून स्वतःचा बँड तयार केला. बँड तयार केल्यानंतर आतिफने त्याचा अल्बम रिलीज केला. आतिफचा पहिला अल्बम हिट झाला. त्याचा अल्बम पाकिस्तानमध्ये खूप आवडला होता.
अशा प्रकारे मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक
आतिफला महेश भट्ट यांनी बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. जहरमधील 'वो लम्हे' हे गाणं गाऊन त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर आतिफ बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाला. त्याने 'तेरे संग यारा', 'बेनताहा', 'पहली नजर में', 'तू जाने ना' अशी अनेक गाणी गायली आणि ती सुपरहिट ठरली. गायनाव्यतिरिक्त आतिफने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. त्याने 'बोल' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.