Zee Marathi Awards 2025 : मराठी मालिका विश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरशी झुंज देत निधन झाले. संपूर्ण कलाविश्वावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. झी मराठी पुरस्कार 2025 सोहळ्यादरम्यान तिला भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यात प्रियाचे जवळचे मित्र आणि सहकारी तिला आठवून भावुक झालेले दिसत आहेत.
प्रियाच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कलाकारांचे डोळे पाणावले. विशेषतः तिचा खास मित्र अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. अभिजित खांडकेकर बोलताना म्हणाला, 'आजचा हा सोहळा स्वप्नांचा आहे. पुरस्कार जाहीर होत आहेत. पण याच निष्ठेने एका हरहुन्नरी अभिनेत्रीने आपली प्रत्येक भूमिका जिवंत केली. मग ती नायिका असो वा खलनायिका...' प्रियाबद्दल बोलताना अश्रू अनावर झाल्याने अभिजितला पुढे बालताही आले नाही.
VIDEO
अभिजितनंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेही प्रियाच्या विविध भूमिकांच्या आठवणींना उजाळा दिला. मृण्मयी म्हणाली, 'प्रियाने 'या सुखांनो या' मालिकेतून झी मराठीवर पदार्पण केले. त्यानंतर 'तू तिथे मी' मधील प्रिया मोहिते ही खलनायिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तसेच, 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील गोदावरी आणि 'येऊ कशी कशी मी नांदायला' मधील बॉस... तिने पडद्यावर रंगवलेल्या या सर्व भूमिका प्रेक्षकांना खूप भावल्या.'
मृण्मयीने पुढे तिच्या आणि प्रियाच्या मैत्रीच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले की, पडद्यावरील भूमिका रंगवत रंगवत ती खऱ्या आयुष्यातील जवळची मैत्रीण, आदर्श मुलगी आणि सदैव साथ देणारी बायको झाली. मृण्मयीने भावुक होत समारोप करताना सांगितले की, 'प्रिया आजही आपल्या स्मृतीत आहे. तिच्या प्रत्येक कलाकृतींमध्ये ती जिवंत आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये आहे.