Vineet Kumar Singh EXCLUSIVE: छावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफीसवर तुफान चालला आहे. हा चित्रपट लोकांच्या पसंतीलाही पडत आहे. या चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतूक होत आहे. विकी कौशल बरोबरच विनीत कुमार सिंह याच्या ही अभिनयाचं कौतूक होत आहे. त्याने या चित्रपटात कवी कलशची भूमिका सादर केली आहे. या भूमिकेबद्दल NDTV मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांना दिलेल्या खास मुलाखतीत तो भरभरून बोलला. शिवाय छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यातील मैत्रीबद्दल ही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं. ते महाराष्ट्रातील रायगडमधील आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा, छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश याचा इतिहास त्यांना माहित आहे असं अभिनेता विनीत कुमार सिंग याने सांगितलं. लक्ष्मण उतेकर यांनी आधीपासून ठरलं होतं की कोणतीही गोष्ट सिनेमात करायची नव्हती, जी फक्त सिनेमा चालेल म्हणून करावी लागते. त्यामुळे काय करायचं आहे हे त्यांच्या डोक्यात स्पष्ट होतं असंही तो म्हणाला. शिवाय कोणत्याही गोष्टीत मुद्दाम छेडछाड करायची नाही हे पण त्यांनी क्लिअर केलं होतं. त्यांनी वेळोवेळी आम्हा सर्वांना मार्गदर्शन ही केलं. जे आहे तसं दाखवण्यावर त्यांचा भर होता. त्यात ते यशस्वी ही झाले असं त्यांने सांगितलं.
हा चित्रपट सर्वांना आवडत आहे. ज्या लेझीमच्या गाण्यावरून वाद झाला. त्यानंतर ते गाणं ही वगळण्यात आलं. हा सिनेमा लोकांना आता डोक्यावर घेतला आहे. स्वतः पंतप्रधान यांनीही छावा सिनेमाबाबत उल्लेख केला आहे. त्यामुळे लोकांना सिनेमा आवडतोय, भावतोय, ही मोठी गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 32 वर्षी एवढा मोठा त्याग केला. आपण स्वत: पेशाने डॉक्टर आहे. जखम साफ करायला लोकं, येतात. तेंव्हा ते ओरडतात हे मी पाहिलं आहे. असं विनीत सांगतात.
पण छत्रपती संभाजी महाराजांच्या जखमेवर मीठ लावलं जातंय. तरीही त्यांच्या तोंडातून शब्द येत नाही. त्यामुळे किती मोठं आत्मबळ राहिलं असेल महाराजांचं असं ही तो सांगतो. त्यावेळी कवी कलश यांच्यासोबत उभे आहेत. ही किती मोठी गौरवगाथा आहे. मैत्रीची पराकाष्ठा आहे. असा मित्र सोबत असला तर माणूस धन्य होईल. जो मरणाच्या वेळीही महाराजां सोबत होता. बरं कवी कलश यांच्याकडे तिथून निघून जाण्याची संधी होती. पण त्यांनी तसं केलं नाही, असं ही विनीत याने यानिमित्ताने सांगितलं. त्यांच्या या मैत्रीने कुणीही भारावून जाईल असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Chhaava Movie: लाडक्या बहिणींसाठी 'छावा' चित्रपट मोफत! कधी अन् कुठे? जाणून घ्या...
ज्यावेळी संभाजी महाराज यांच्या संगमेश्वर इथं हल्ला करण्यात आला, त्यावेळी सरदेसाईंच्या वाड्यावर जी लढाई झाली, तेंव्हा महाराज म्हणतात तुम्ही रायगडाकडे निघावं. तेंव्हा कवी कलश म्हणतात, कायम माझ्याकडे शंकेने पाहिलं गेलं. त्यामुळे ही संधी माझ्याकडून काढून घेऊ नका महाराज. वीस मावळ्याची तुकडी तयार आहे. तुम्ही रायगडाकडे कूच करा. असं कवी कलश सांगतात. मित्र एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. अशी मैत्री मिळाली तर आयुष्य धन्य होईल. हे समजले असंही विनीत यांनी या निमित्ताने सांगितलं.
छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश यांनी मैत्री कशी असावी हे दाखवून दिले. त्यांच्या मैत्रीला तोड नव्हती. मरेपर्यंत या दोघांनी एकमेकांना साथ दिली. शेवटी 11 मार्च 1689 रोजी या दोघांची ही हत्या करण्यात आली. त्यामुळे मैत्रीचा दिवस कधी असावा तर तो 11 मार्च रोजी असावा असं अभिनेता विनीत कुमार सिंग यानं या मुलाखतीत सांगितलं. खऱ्या मैत्रीचं एवढं मोठं उदाहरण समोर असताताना 11 मार्चला मैत्रीचा दिवस साजरा करायला काय हरकत आहे असं ही तो म्हणाला. शिवाय फ्रेंडशिप डे वर्षातून दोनदा साजरा झाला तर कुठे बिघडलं असं मत ही त्याने व्यक्त केलं.