Zakir Hussain : महान तबला वादक झाकीर हुसैन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झालं. हुसैन यांनी गेल्या सहा दशकामध्ये त्यांच्या तबला वादनानं संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केलं होतं. कुरळ्या केसांच्या आणि सैदव हसरा चेहऱ्याच्या झाकीर हुसैन यांच्या वादनाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळेच त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधानामुळे संगीत क्षेत्रामध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहिली आठवण
1990 च्या दशकात टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या एका जाहिरातीमुळे झाकीर हुसैन यांचं नाव अनेकांना पहिल्यांदा माहिती झालं. ब्रूक बाँड ताज महाल चहाच्या जाहिरातीमधील झाकीर हुसेन चांगलेच गाजले होते. संपूर्ण पिढीसाठी ही जाहिरात कधीही न विसरणारी आठवण आहे. ताज महालच्या बॅकड्रॉपमध्ये 'वाह उस्ताद नही, वाह ताज बोलिए' हे हुसैन यांचे शब्द आजही अनेकांच्या लक्षात आहेत.
कशी झाली निर्मिती?
ब्रूक बाँड चहा 1966 साली कोलकातामध्ये सुरु झाला. विशेष म्हणजे महान तबला वादक या जाहिरातीसाठी पहिली चॉईस नव्हते. अभिनेत्री झीनत अमान आणि मालविका तिवारी यांनी या जाहिरातीमध्ये काम केलं होतं. पण, 1980 च्या दशकात आपल्या ताजमहाल चहाची लोकप्रियता मध्यमवर्गीयांमध्येही वाढत आहे, हे चहा निर्मात्यांच्या लक्षात आले.
( नक्की वाचा : Zakir Hussain Passes Away: जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचे निधन )
ताज महाल चहाची नवी इमेज तयार करण्यासाठी हिंदुस्थान थॉमसन असोसिएट्स (HTA) ची मदत घेण्यात आली. कंपनीच्या नव्या ग्राहकांना अपील होईल अशा नव्या चेहऱ्याची त्यांना गरज होती. त्याचबरोबर त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृती यांचा मिलाफ साधणारा चेहरा हवा होता.
एचटीएचे कॉपीराईटर केएस चक्रवर्ती हे तबला वादनाचे चाहते होते. त्यांना झाकीर हुसेन हे या जाहिरातीसाठी योग्य व्यक्ती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याबाबत प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तानुसार झाकीर हुसैन यांना या जाहिरातीची कल्पना इतकी आवडली की ते स्वत:च्या खर्चानं शूटिंगसाठी सन फ्रँसिस्कोहून आग्राला आले होते.
या जाहिरातीची संकल्पना सोपी होती. झाकीर हुसैन ज्या प्रमाणे त्यांची कला सर्वोत्तम सादर करण्यासाठी अनेक तास सराव करतात त्याचपद्धतीनं ताजमहाल चहाचे उत्पादकही परिपूर्ण मिश्रण आणि सुगंध शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचणी करत असतात, अशी या जाहिरातीची संकल्पना होती.
देशात 1991 मध्ये आर्थिक सुधारणानंतर केबल टीव्ही घरोघरी पोहोचला. उस्तादांचे हास्य टीव्हीच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले. चहाच्या ब्रँडलाही त्याचा फायदा झाला. 'ऑल टाईम ग्रेट' जाहिरातींमध्ये या जाहिरातीचा समावेश आहे. त्यानंतरच्या काळात या जाहिरातीमध्ये पॉप गायिका आलिशा चिनॉयसह अनेक चेहरे दिसले. पण, उस्ताद झाकीर हुसैन यांचा चेहरा या जाहिरातीचा अविभाज्य भाग होता.