बॉलिवूडचे 'डिस्को किंग' म्हणून ओळख मिळवणारे पहिले संगीतकार म्हणजे बप्पी लहरी. हिंदी चित्रपटात रॉक संगिताचं युग त्यांनी सुरु केलं. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक गाण्यांनी 1980 आणि 90 च्या दशकात तरुणाईला थिरायला लावलं.
'आय अॅम अ डिस्को डान्सर', 'यार बिना चैन कहां रे', तम्मा तम्मा लोगे 'रात बाकी, बात बाकी' 'ऊह ला ला...' ही त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी चांगलीच गाजली होती. डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल, हिम्मतवाला या सिनेमांना त्यांनी दिलेलं संगीत चांगलंच गाजलं.
'बप्पी दा' या नावानं त्यांच्या फॅन्समध्ये लोकप्रिय असलेल्या या संगीतकाराची आणखी एक खास ओळख होती.
कधी झाली सुरुवात?
बप्पीदा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने घालण्यास कधी सुरुवात केली हे सांगितलं होतं. 'माझ्या पहिल्या सुपरहिट अल्बननंतर आईनं 'हरे-रामा, हरे-कृष्णा'चं सोन्याचं लॉकेट मला भेट दिलं होतं. मला सोनं लकी असल्याचं आई त्यावेळी म्हणाली होती, अशी आठवण बप्पीदा यांनी सांगितली होती.
कुणापासून प्रेरणा?
बप्पीदांना पहिलं सोन्याचं लॉकेट त्यांच्या आईंनी दिलं. पण, त्यांना गळ्यात दागिने घालण्याची प्रेरणा एका विदेशी संगीतकारानं दिली. अमेरिकी पॉप स्टार एल्विस प्रेसली यांचा बप्पीदांवर मोठा प्रभाव होता. प्रेसली त्यांच्या कार्यक्रमात सोन्याची चेन घालत असतं.
प्रेसली यांना पाहिल्यानंतर आपणही यशस्वी झाल्यानंतर गळ्यात सोन्याची चेन घालू असं बप्पीदा यांनी ठरवलं होतं. त्यांनी स्वत:चं ही माहिती दिली होती.
दागिन्यांचं पेटंट
बप्पीदा यांना फक्त दागिने घालण्याची आवड नव्हती. ते स्वत:च्या लूकबाबत चांगलेच जागरुक होते. आपल्या लुकची कुणीही कॉपी करु नये म्हणून त्यांनी त्याचे पेटंटही मिळवले होते.
'मला गोल्ड मॅन म्हणून ओळखलं जातं, याचा अभिमान आहे. अनेक जण माझ्या लुकची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात, पण ते सहज शक्य नाही, असं बप्पीदा यांनी एकदा म्हंटलं होतं.
वर्ल्ड रेकॉर्डची नोंद
बप्पी लहरी यांनी अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिलं. आजही बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिस्को गाण्यांची यादी बप्पी दा यांच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. मिथून चक्रवर्ती यांच्या 'डिस्को डान्सर' या सिनेमातील संगीत चांगलंच सुपरहिट झालं होतं.
या सिनेमातील 'जिमी, जिमी, आजा आजा' हे गाणं तब्बल 45 भाषांमध्ये डब करण्यात आले होते, हा देखील एक रेकॉर्ड आहे.