Sachin Pilgaonkar reveals Sanjeev Kumar story: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांच्या अभिनयाचा ठसा आजही प्रेक्षकांच्या मनावर उमटलेला आहे. शोले, आंधी आणि अंगूर यांसारख्या अजरामर चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार हे त्यापैकीच एक प्रमुख नाव. संजीव कुमार यांनी वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली होती. मात्र संजीव कुमार त्यांच्या वयापेक्षा खूप मोठ्या असणाऱ्या भूमिका चित्रपटांमध्ये का साकारायचे, यामागचे एक गूढ कारण आता समोर आले आहे.
सचिन पिळगावकरांचा खुलासा
प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या आणि संजीव कुमार यांच्यातील घट्ट मैत्रीच्या आठवणींना उजाळा देताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. संजीव कुमार यांनी एका भविष्यकाराने वर्तवलेल्या भाकिताबद्दल सचिन यांना सांगितले होते. एका हस्तरेषा तज्ज्ञाने आपले आयुष्य फार मोठे नाही आणि आपण कधीच म्हातारपण पाहू शकणार नाही, अशी भविष्यवाणी केली होती.
त्यामुळेच जे आयुष्य प्रत्यक्षात जगायला मिळणार नाही, तो आयुष्याचा टप्पा पडद्यावर तरी अनुभवावा यासाठी आपण मोठ्या वयाच्या भूमिका साकारतो, असे संजीव कुमार यांनी सचिन यांना सांगितले होते.
( नक्की वाचा : पैशांमुळे तुटलं Abhishek आणि Karisma चं लग्न? काय होती बबिताची अट? 22 वर्षांनंतर ब्रेकअपचे गूढ उलगडले! )
निधनापूर्वी झालेली 'ती' भेट
संजीव कुमार यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी सचिन पिळगावकर एका डबिंग सेशनदरम्यान त्यांना भेटले होते. त्यावेळी संजीव कुमार यांनी सचिन यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येण्यास सांगितले. मात्र सचिन यांनी दुपारी 2 ते 2:30 च्या दरम्यान येईन असे सांगितले. ठरलेल्या वेळेनुसार सचिन जेव्हा संजीव कुमार यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते बेडरूममधील बाथरूममध्ये असल्याचे त्यांना सांगण्यात आले. सुमारे 30 मिनिटे वाट पाहिल्यानंतर सचिन यांना काहीतरी गडबड असल्याची शंका आली आणि त्यांनी चौकशी केली.
त्यावेळी संजीव कुमार यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांना बोलावण्यात आल्याचे समोर आले. संजीव कुमार यांचे सचिव जमनादास हे डॉक्टर गांधी यांना घेऊन घरी आले. संजीव कुमार आदल्या रात्री उशिरा म्हणजे पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत काम करून परतले होते आणि त्यांना उलट्या झाल्या होत्या. प्रकृती ठीक नसतानाही ते एवढे उशिरापर्यंत काम का करत होते, म्हणून त्यांना भेटल्यावर ओरडणार असल्याचे सचिन यांनी मनात ठरवले होते. कारण संजीव कुमार हे सचिन यांचे मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक होते.
( नक्की वाचा : NEET Paper Leak: मोबाईल नाही, कॅमेरा नाही... तरीही 'नीट' चा पेपर कसा लीक झाला? CBI तपासात उघड झाली सर्व माहिती )
...आणि भविष्य खरे ठरले
बेडरूमचा दरवाजा बंद होता आणि बाहेर असलेले लोक आत जाण्यास घाबरत होते. सचिन यांनी अखेर स्वतः हिंमत करून दरवाजा उघडला. त्यावेळी समोरचे दृश्य पाहून सचिन यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संजीव कुमार बेडरूममधील कारपेटवर उपड्या पाठीवर पडले होते आणि त्यांचा एक हात दरवाजाच्या दिशेने पसरलेला होता.
सचिन यांनी तातडीने डॉक्टरांना आत बोलावले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संजीव कुमार यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 6 नोव्हेंबर 1985 रोजी घडलेल्या या घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरवली होती. हस्तरेषा तज्ज्ञाचे ते भाकीत शेवटी खरे ठरले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world