प्रकाश राज भाजपामध्ये प्रवेश करणार? 'सिंघम' अभिनेत्यानं सोशल मीडिया पोस्टला दिलं उत्तर

Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज हे भाजपामध्ये प्रवेश करणार ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election) घोषणा होताच पक्षांतराचा हंगाम सुरु झाला आहे. वेगवेगळ्या पक्षांमधून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच अभिनेते प्रकाश राज हे भाजपामध्ये प्रवेश करणार ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मोदी सरकारच्या धोरणांचे टीकाकार म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रकाश राज यांच्याबद्दलच्या या पोस्टनं एकच खळबळ उडाली होती. अखेर या अभिनेत्यानं या सर्व चर्चेला उत्तर दिलंय.

एक्स (पूर्वीचे नाव ट्विटर) वर एक उपहासात्मक पोस्ट करत या अभिनेत्यानं लिहलं, ' मला वाटतंय की त्यांनी प्रयत्न केला होता. पण, ते मला (वैचारिक दृष्टीनं) खरेदी करु शकतील इतके श्रीमंत नाहीत, ही जाणीव त्यांना झाली असावी.  तुम्हाला काय वाटतं? मित्रांनो?.'
 

59 वर्षांच्या प्रकाश राज यांनी 'द स्किन डॉक्टर' या युझरनं उत्तर देताना ही पोस्ट केली आहे. 'प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज आज दुपारी 3 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार,' अशी पोस्ट या युझरनं केली होती. गुरुवारी दुपारी 2 वाजून 56 मिनिटांनी केलेली ही पोस्ट अगदी कमी कालावधीत व्हायरल झाली. त्याला प्रकाश राज यांनी उत्तर देण्यापूर्वी जवळपास दहा लाख जणांनी पाहिलं होतं. 

Advertisement

यापूर्वी तीन राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीपूर्वी मला आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा प्रकाश राज यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात केला होता. हे पक्ष विचारधारेमुळे नाही तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकाकार असल्यानं मागे लागले आहेत, मी त्यांच्या जाळ्यात अडकणार नाही, असं राज यांनी सांगितलं होतं. 

प्रकाश राज यांनी कांचीवरम, सिंघम, वॉन्टेडसह अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी 2019 साली बंगळुरु मध्ये मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. यंदा लोकसभा निवडणूक 19 एप्रिलपासून सात टप्प्यांमध्ये होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होईल. 

Advertisement