एक भारतीय म्हणून यापेक्षा चांगली वेळ यापूर्वी कधीही नव्हती. पुढील दशकात भारत दरवर्षी दर 12 ते 18 महिन्यांमध्ये अर्थव्यवस्थेत ट्रिलियन डॉलर्सची भर टाकेल. 2050 पर्यंत आपण 30 ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनू, असा विश्वास अदाणी ग्रुपचे संचालक गौतम अदाणी यांनी व्यक्त केला आहे. क्रिसिल (CRISIL) च्या वार्षिक इन्स्फ्रास्ट्रक्चर परिषदेमध्ये ते बोलत होते. पायाभूत सुविधा या कोणत्याही अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याचबरोबर शेअर बाजाराबाबतही मोठं भाकित केलं आहे.
रस्ते, पूल, रेल्वे, बंदरं सारख्या पायाभूत सुविधा कोणत्याही अर्थव्यवस्थेला भक्कम बनवतात हा मुद्दा अदाणी यांनी रोमन साम्राज्य आणि ब्रिटीश शासनापासून ते चीन आणि भारताचं उदारहण देत समजावून सांगितला. त्याचबरोबर उत्तम शासन, उत्तम सरकार आणि उत्तम धोरणांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
उदारीकरण हा टर्निंग पॉईंट
'उदारीकरण (Liberalisation) हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा टर्निंग पॉईंट होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारनं बहुतेक सेक्टरमधून लायसन्स राजपासून मुक्त केले. त्यामुळे गुंतवणूक करणे, क्षमता वाढवणे आणि किंमती निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली सरकारची मंजुरी रद्द झाली. 'उदारीकरणामुळे 1991 ते 2014 पर्यंत विकासाच्या गतीचा पाया तयार केला. त्यानंतर 2014 ते 2024 या कालावधीत अर्थव्यवस्था भरारी घेत आहे,' असं ते यावेळी म्हणाले.
भारतीय म्हणून सर्वात चांगला काळ
ते पुढे म्हणाले, 'भारत ज्या गतीनं पुढं जातोय, सरकार ज्या पद्धतीनं सामाजिक आणि आर्थिक सुधारणा लागू करत आहे, ते पाहता माझ्या अंदाजानुसार पुढील दशकामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक 12 ते 18 महिन्यात एक ट्रिलियन डॉलर GDP ची वाढ होईल. या गतीनुसार 2050 पर्यंत आपण 30 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं वाटचाल करु'
कुणीही जवळ नाही!
गौतम अदाणी यावेळी म्हणाले की, 'मला आशा आहे की, शेअर बाजारातील मार्केट कॅप 40 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होईल. याचाच अर्थ म्हणजे पुढच्या 26 वर्षात भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये 36 ट्रिलियन डॉलरची संभाव्य वाढ अपेक्षित आहे.'
कोणताही देश या संभाव्य शक्यतेच्या जवळपास नाही, एक भारतीय म्हणून यापेक्षा चांगला काळ कोणताही असू शकत नाही, असा विश्वास अदाणी यांनी व्यक्त केला.
त्यांनी सांगितलं 'आमच्या सर्व आशा, आमचा आशावाद आणि आमचा विश्वास आमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. कारण आपण भारताला जुनं वैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकत्र काम करत आहोत. त्यामुळेच मी सांगतोय की,. 'भारतीय म्हणून यापेक्षा चांगला काळ कधीही नव्हता.'
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)