युद्धाच्या सावटात 'अरब' कंपनीचा भारतावर मोठा डाव! तब्बल 8800 कोटी खर्चून 'या' कंपनीत गुंतवणूक

पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडालेला असतानाच अबुधाबीच्या एका बड्या कंपनीने भारतात मोठी गुंतवणूक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
गगन बांगा, MD CEO, सन्मान कॅपिटल
पुणे:

पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडालेला असतानाच अबुधाबीच्या एका बड्या कंपनीने भारतात मोठी गुंतवणूक करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) भारतातील आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय संस्था असलेल्या 'सम्मान कॅपिटल'मध्ये तब्बल 8800 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मालकी हक्क मिळवला आहे. जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असताना भारताच्या आर्थिक क्षेत्रावर दाखवलेला हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

कसा झाला हा अब्जावधींचा व्यवहार?

अबुधाबीच्या आयएचसी समूहाने आपली संलग्न कंपनी 'अव्हेनिर इन्व्हेस्टमेंट'मार्फत हा व्यवहार पूर्ण केला आहे. या गुंतवणुकीमुळे सम्मान कॅपिटलमधील आयएचसीचा हिस्सा 41.5 टक्क्यांवर पोहोचला असून आता ही कंपनी या समूहाची प्रवर्तक (Promoter) म्हणून काम पाहणार आहे. 

Advertisement

या व्यवहाराच्या पहिल्या टप्प्यात कंपनीला 5652 कोटी रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक मिळाली आहे. येत्या 18 महिन्यांत वॉरंट्सचे रूपांतर झाल्यानंतर आणखी 3198 कोटी रुपये कंपनीला मिळतील. इतकेच नाही तर खुल्या ऑफरनंतर आयएचसीचा या कंपनीतील वाटा 63.3 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा : Pune News: पुणेकरांची चंगळ! खिसा गरम होणार अन् टॅक्सही वाचणार; 1 एप्रिलपासून 'या' नियमामुळे पगार वाढणार )

युद्धाच्या सावटात भारतावर मोठा विश्वास

पश्चिम आशियात सध्या युद्धाची परिस्थिती आहे, अशा कठीण काळातही अबुधाबीच्या कंपनीने भारतात एवढी मोठी गुंतवणूक करणे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचे लक्षण मानले जात आहे. 

सम्मान कॅपिटल ही देशातील एक महत्त्वाची एनबीएफसी (NBFC) असून आता तिला जागतिक भांडवल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे संस्थात्मक पाठबळ मिळणार आहे. या भागीदारीमुळे कंपनीला केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

आयएचसी समूहाचा भाग झाल्यानंतर सम्मान कॅपिटलने आता मोठी झेप घेण्याचे ठरवले आहे. येत्या 2029 पर्यंत मालमत्ता व्यवस्थापनाच्या आधारावर देशातील पहिल्या तीन एनबीएफसी कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. एमएसएमई (MSME), वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज आणि सोन्यावरील कर्ज अशा विविध क्षेत्रांत कंपनी आता वेगाने विस्तार करणार आहे. ही कंपनी आता आयएचसीच्या 'जुडान फायनान्शियल' या जागतिक वित्तीय सेवा प्लॅटफॉर्मचा भाग झाल्यामुळे भारतात खाजगी कर्ज वितरणाच्या नव्या संधी निर्माण होतील.

Advertisement

या ऐतिहासिक भागीदारीबद्दल बोलताना सम्मान कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक गगन बंगा यांनी आनंद व्यक्त केला आहे. आयएचसीचे प्रवर्तक म्हणून स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटत असून, या भागीदारीमुळे कंपनीला दीर्घकालीन भांडवल आणि जागतिक क्षमता मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

दुसरीकडे, आयएचसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद बसर शुएब यांनी म्हटले आहे की, भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रात विस्तार करणे हे आमच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग आहे. सम्मान कॅपिटलच्या माध्यमातून आम्ही भारतातील ग्राहकांसाठी अधिक मूल्यनिर्मिती करण्यास बांधील आहोत.
 

Advertisement