अमेरिकेमध्ये अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईचा स्वतंत्रपणे आढावा घेतला असता कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता झाली आहे असे आढळून आले नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या न्याय विभागाने अदाणी ग्रीन कंपनीच्या दोन कार्यकारी संचालक आणि एका बिगर कार्यकारी संचालकाच्याविरोधात खटला दाखल केला होता. आर्थिक अनियमितता आणि भ्रामक, दिशाभूल करणारे दावे केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या आरोपांचा अदाणी समूहाने सुरूवातीपासूनच इन्कार केला होता. जानेवारी महिन्यात अदाणी समूहाने या कथित गैरप्रकाराचा त्रयस्थपणे आढावा घेण्यासाठी लॉ फर्मची नियुक्ती करण्यात आली होती.
काय झालं उघड?
अदाणी ग्रीनने एक्सचेंज फायलिंगमध्ये या संदर्भात दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की. "या स्वतंत्र आढाव्यामध्ये कंपनीने आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता केल्याचे दिसून आलेले नाही." अदाणी समूहाने आणि समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी पहिल्या दिवसापासून अदाणी ग्रीनवर लावलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते. स्वतंत्रपणे घेण्यात आलेल्या आढाव्यामध्ये असे दिसून आले आहे की कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्यांनी कायद्याचे कुठेही उल्लंघन केलेले नाही.
( नक्की वाचा : Hindenburg: हिंडनबर्ग बंद का झाली? कॉर्पोरेट जगातल्या जबरदस्त कमबॅकची 'मोसाद' लिंक )
एक्सचेंज फायलिंगमध्ये असेही म्हटले आहे की "सदर प्रकरणात सुरू करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईचा कंपनीवर कोणताही परिणाम होणार नाही." कंपनीने एक्सचेंज फायलिंगद्वारे हे देखील कळवलं आहे की बोर्डाने विनीत.एस.जैन यांना 10 जुलैपासून पुढील पाच वर्षासाठी प्रकल्प संचालक म्हणून पुन्हा नियुक्त करण्यास मंजुरी दिली आहे.
अदाणी ग्रीन एनर्जीने या फायलिंगसोबतच चौथ्या तिमाहीचे निकालही प्रसिद्ध केले आहेत. कंपनीचे कर, व्याज,घसारा आणि इतर वजावट धरून उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी वाढले आहे. चौथ्या तिमाहीच्या निकालात कंपनीचे उत्पन्न 2453 कोटी रुपये नोंदवण्यात आले. कंपनीची उर्जानिर्मिती क्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही क्षमता 14.2 गिगावॅटने वाढली आहे. या आधारे अदाणी ग्रीन ही भारतातील सगळ्यात मोठी अपारंपरीक उर्जा निर्मिती कंपनी बनली आहे.