Hurun India rich list 2024 : गौतम अदाणी श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी; भारतात 5 दिवसात एक नवा अब्जाधीश

हुरुन इंडियानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रत्येक पाच दिवसात एक नवा अब्जाधीश तयार झाला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी आणि त्यांचे कुटुंबीय हुरुनच्या 2024 च्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 95 टक्के वाढीसह त्यांची संपत्ती 11.61 लाख कोटींच्या पार गेली आहे. हुरुनच्या भारतातील श्रीमंतांच्या यादीनुसार, देशभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 334 भारतीय अब्जाधीश आहेत. जे 13 वर्षांपूर्वीच्या यादीच्या सुरुवातीला असलेल्या अब्जाधीशांच्या संख्येपासून सहापटीने जास्त आहेत. 

श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 10.14 लाख कोटींपर्यंत पोहोचली आहे. 

1539 भारतीयांची संपत्ती 1000 कोटींहून अधिक
हुरुन इंडियाच्या यंदाच्या श्रीमंतांच्या यादीत 1539 भारतीयांचा समावेश आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,000 कोटींपेक्षा अधिक आहे. ही संख्या गेल्यावेळेसच्या तुलनेत 220 हून अधिक आहे. या सूचीत 272 नावं पहिल्यांदाच यादीत दाखल झाली आहेत. 1,000 कोटींहून अधिक संपत्ती असलेल्यांनी पहिल्यांदाच 1,500 चा आकडा पार केला आहे आणि गेल्या पाच वर्षांदरम्यान यात 86 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

हुरुन इंडियानुसार, गेल्या वर्षी भारतात प्रत्येक पाच दिवसात एक नवा अब्जाधीश तयार झाला आहे. 

नक्की वाचा - रमाकांत आचरेकरांच्या शिवाजी पार्कातील आठवणी ताज्या होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

शाहरूख खानलाही मिळाली श्रीमंतांच्या यादीत जागा...
भारतीय चित्रपटसृष्टीचा बादशाह म्हणून ओळख असलेला शाहरूख खान याने पहिल्यांदाच हुरून इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत जागा पटकावली आहे. त्याची एकूण संपत्ती 7,300 कोटींपर्यंत पोहोचली आहे. चित्रपट क्षेत्रातून शाहरुख खान याच्याशिवाय जूही चावला आणि तिचे कुटुंबीय, ऋतिक रोशन, करण जोहर आणि अमिताभ बच्चन यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. 

Advertisement

भारतीय श्रीमंतांची एकूण संपत्ती भारताच्या अर्ध्या GDP हून अधिक...
हुरून इंडियाच्या यादीतील श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ झाली असून ती 159 पर्यंत पोहोचली आहे. ही संख्या सऊदी अरब आणि स्विर्त्झलँडच्या संयुक्त GDP हून अधिक आहे आणि भारताच्या GDP च्या अर्ध्याहून अधिक आहे. 

हुरुन इंडियाच्या यादीत सामील झालेली व्यक्ती 29 उद्योग आणि 42 शहरांमधील आहेत. यातील 1,334 जणांनी आपल्या संपत्तीत वाढ केली आहे. 272 नवे चेहरे, 205 जणांच्या संपत्तीत घट आणि 45 जणांची नावं सूचीमधून बाहेर पडली आहे. याशिवाय पाच जणांचं निधन झालं आहे. 

Advertisement

मुंबईत सर्वाधिक श्रीमंत...
या यादीनुसार मुंबईत सर्वाधिक 386 श्रीमंत व्यक्ती राहतात. दिल्लीत 217, हैद्राबाद 103 श्रीमंत व्यक्ती राहतात. मुंबईत यंदाच्या वर्षी 66 नवी नावं जोडली गेली आहेत.   

एचसीएलच्या शेअरच्या किमतीत 50 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे 79 वर्षीय शिव नाडर 3.1 लाख कोटींच्या संपत्तीसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. 1,200 कोटी रुपयांच्या संपत्तीसह 45 वर्षीय आनंद चंद्रशेखरन हे 2024 च्या हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवणारे पहिले गुंतवणूकदार आहेत. या यादीतील सर्वात तरुण अब्जाधीश हर्षिल माथूर आणि शशांक कुमार (दोघांचे वय 33) आहेत, जे RAZORPAY या पेमेंट सोल्यूशन्स ॲपचे संस्थापक आहेत.