देशातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन पावर आणि गुगल यांच्यात आज (गुरुवार, 3 ऑक्टोबर) ऐतिहासिक करार झाला. या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या 30 गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
कोणत्याही डेटासेंटरला मोठ्या प्रमाणात वीज लागते. ही वीज हरित उर्जा प्रकल्पातून निर्मित असल्यास ते डेटा सेंटर देखील हरित डेटा सेंटरच्या यादीत सामील होते. गुगलनं आपली सगळी डेटा सेंटर हरित उर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतलाय. गुगलच्या या निर्णयाला आता अदाणी समूहाची साथ मिळणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये अदाणी समूहाच्या या जगातील सर्वात मोठ्या हरित उर्जा प्रकल्पात पूर्ण क्षमतेनं वीज निर्मीती सुरु होईल.
कच्छच्या रणात उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पातून 81 दशलक्ष युनिट हरित वीज निर्मिती होईल. जवळपास 1 कोटी 61 लाख कुटुंबांनी या प्रकल्पातून सौर उर्जा पुरवठा होणार आहे. त्याच प्रकल्पातून आता गुगललाही वीज पुरवठा होईल.
( नक्की वाचा : अदाणी समूहाचा मोठा सन्मान, TIME नं तयार केलेल्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत समावेश )
मोठ्या प्रमाणात पवन, सौर, संकरित आणि ऊर्जा साठवण प्रकल्प वितरित करण्याच्या क्षमतेसह, अदाणी कमर्शिअल अँड इंडस्ट्रियल (C&I) चे उद्दिष्ट ग्राहकांना त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आवश्यक उपाय पुरवणे आहे, अशी माहिती याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये देण्यात आली आहे.
कार्बनमुक्त उद्योगांची योजना
अदाणी समूहाची उद्योगांना कार्बन मुक्त होण्यासाठी व्यापारी आणि C&I विभागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे. हे सहकार्य Google चे 24/7 कार्बन मुक्त ऊर्जा उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत करेल. या सहकार्यामुळे भारतातील क्लाउड सेवा आणि ऑपरेशन्स हरित उर्जेवर चालतील. देशातील Google च्या विस्तारासाठीही या काराराची मदत होईल,अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)