Bank Holiday: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या बँक सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, छट पूजा, सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इतर प्रादेशिक उत्सवांमुळे पुढील आठवड्यात देशाच्या काही भागांमध्ये बँका बंद राहतील. या सुट्ट्या राज्यानुसार आणि प्रादेशिक सणांनुसार वेगवेगळ्या शहरांमध्ये लागू असतील.
छट पूजेमुळे या शहरांमध्ये बँकांना सुट्टी
छट पूजा हा 4 दिवसांचा उत्सव असून तो सूर्य देवाला समर्पित आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या काही भागांत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. छठ पूजेनिमित्त सोमवारी (27 ऑक्टोबर) कोलकाता, पटना आणि रांची येथील बँका बंद राहतील. तर मंगळवारी (28 ऑक्टोबर) छट पूजेमुळे पटना आणि रांची येथील बँकांना सुट्टी असेल. महाराष्ट्रात मात्र बँका सुरु असतील.
यामुळे, पटना आणि रांची येथील बँका या आठवड्याच्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह सलग 4 दिवस बंद राहतील, ज्यामुळे या शहरांमधील बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
https://marathi.ndtv.com/finance/lic-clarifies-adani-investment-no-govt-pressure-portfolio-grew-10-times-since-2014-9514586
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीमुळे बँक बंद
भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी अहमदाबाद (गुजरात) येथील बँका बंद राहतील.
प्रादेशिक सणांमुळे सुट्ट्या
शनिवारी कर्नाटक राज्याच्या निर्मितीचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे, बंगळूर येथील बँकांना सुट्टी असेल. दिवाळीनंतर 11 दिवसांनी उत्तराखंडमध्ये इगास बगवाल हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामुळे डेहराडून येथील बँका बंद राहतील.
1 नोव्हेंबरला देशभरातील बँका सुरू राहणार
नोव्हेंबर महिन्याचा पहिला शनिवार असल्यामुळे आणि आरबीआयच्या नियमांनुसार बँक फक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. त्यामुळे बंगळूर आणि डेहराडून वगळता देशभरातील बँका शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी सुरू राहतील. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
बँक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध सेवा
बँका बंद असल्या तरी, डिजिटल बँकिंग सेवा देशभरात सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांना पैशांचे व्यवहार आणि इतर बँकिंग सेवांसाठी ऑनलाईन बँकिंग, मोबाईल ॲप्स, एटीएम आणि यूपीआय सेवांचा वापर करता येईल. ग्राहकांनी या सुट्ट्या विचारात घेऊन आपले बँकिंग व्यवहार वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.