एडटेक कंपनी बायजूसमोरील प्रश्न कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. बायजूची मूळ कंपनी 'थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड' यापुढे आकाश एज्युकेशनमधील 6 टक्के भागीदारी विकू शकणार नाही. आपत्कालीन लवाद न्यायालयाने कंपनीला हा आदेश दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
थिंक अँड लर्नकडे अब्जाधीश डॉ. रंजन पै यांची कंपनी MEMG फॅमिली ऑफिसचे एकूण 350 कोटी रुपयांचे कर्ज आहे, ज्याची परतफेड करण्यात कंपनी अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत MEMG फॅमिली ऑफिसने मार्च 2024 मध्ये पैसे मिळवण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया सुरू केली होती.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणावरील कायदेशीर लवादाने बायजूच्या मूळ कंपनी 'थिंक अँड लर्न'ला एमईएमजी फॅमिली ऑफिसला 350 कोटी रुपये परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कंपनीला आकाश एज्युकेशनमधील 6 टक्के स्टेक न विकण्यासही सांगण्यात आले आहे.
एकेकाळी 22 बिलियन डॉलरची कंपनी बायजू बऱ्याच काळापासून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. कंपनी गेल्या चार महिन्यांपासून आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकलेली नाही. नुकतच कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना एका पत्राच्या माध्यमातून मार्चचा पगार उशिरा होणार असल्याची माहिती दिली. याशिवाय कंपनीने 500 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या सीईओची नेटवर्थवर शून्यावर...
कंपनीचे सीईओ बायजू रविंद्रन यांची संकट कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. फोर्ब्स बिलेनियर २०२३ च्या यादीत नाव असलेले बायजू रविंद्रन यांची नेटवर्थ या वर्षी शून्यावर घसरली आहे. गेल्या एक वर्षात त्यांची नेटवर्थ 17,545 कोटींवरुन शून्यावर पोहोचली आहे आणि ते याच वर्षी फोर्ब्सच्या बिलेनियर यादीतून बाहेर पडले आहेत.