सोने दररोज नवनवीन विक्रमी उच्चांक गाठत असताना सगळीकडेच याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सोशल मीडियावर 1 किलो सोन्याच्या तुलनेत आजपर्यंतच्या कारच्या किमतीचा एक चार्ट सादर केला आहे. त्यांच्या मते, सध्या 1 किलो सोन्याच्या किमतीत एक लँड रोव्हर कार खरेदी करता येते.
हर्ष गोएंका यांनी 'X' वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोन्याच्या किमतीतील वाढ आणि त्याचे कारच्या किमतीच्या तुलनेत असलेले मूल्य कसे वाढले आहे, हे दाखवले आहे.
गोएंका यांच्या X पोस्टमधील आकडेवारी
कोणत्या वर्षी 1 किलो सोन्यात खरेदी करता येणारी कार
- 1990- मारुती 800 (Maruti 800)
- 2000 - एस्टीम (Esteem)
- 2005 - इनोव्हा (Innova)
- 2010 - फॉर्च्युनर (Fortuner)
- 2019 - बीएमडब्ल्यू (BMW)
- 2025 - लँड रोव्हर (Land Rover)
गोएंका यांनी हा ट्रेंड पुढेही कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला की, 'हे 1 किलो सोने तसेच ठेवा—2030 मध्ये त्याची किंमत कदाचित रोल्स रॉयस कार इतकी असेल आणि 2040 मध्ये खाजगी जेट इतकी असेल!'.
हर्ष गोएंका यांनी 2025 मध्ये 1 किलो सोन्याची तुलना लँड रोव्हरशी केली आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त लँड रोव्हरची एक्स-शोरूम किंमत 63.37 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, गोएंकांचा रोख लँड रोव्हर डिफेंडरकडे होता. कारण त्याची एक्स-शोरूम किंमत 98 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एका चांगल्या मॉडेलची ऑन-रोड किंमत 1.25 कोटी रुपयांच्या जवळपास जाते.
रोल्स-रॉयसबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनी भारतात सध्या घोस्ट सिरीज II ही तिची एंट्री-लेव्हल सॅलून म्हणून विकते, ज्याची किंमत 8.95 कोटी रुपयांपासून सुरू होते. हर्ष गोएंका यांच्यानुसार, 2030 मध्ये 1 किलो सोन्यातून ही लक्झरी सॅलून खरेदी करायची झाल्यास, पुढील 5 वर्षांत सोन्याच्या दरात सध्याच्या किमतीपेक्षा 7 पटीने अधिक वाढ नोंदवावी लागेल. गोएंका यांच्या या विश्लेषणाने सोन्याच्या दीर्घकालीन गुंतवणुकीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.