Cigarette Prices to hike from Feb 1: धूम्रपान करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिगारेट पिणे आरोग्यासाठी तर घातक आहेच, पण आता ते तुमच्या खिशालाही मोठी कात्री लावणार आहे. 1 फेब्रुवारीपासून सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्याच्या किमतीत प्रचंड वाढ होणार आहे. सरकारने या उत्पादनांवरील कर रचनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. 1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन आणि भरमसाठ एक्साइज ड्युटी लागू करण्याचा निर्णय वित्त मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणाऱ्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होणार आहे.
करांमध्ये नेमका काय बदल झाला?
आतापर्यंत या उत्पादनांवर जीएसटी (GST) आणि 'जीएसटी कॉम्पेन्सेशन सेस' लावला जात होता. मात्र, आता हा सेस हटवून सरकारने थेट 'हेवी एक्साइज ड्युटी' लावण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रति 1000 सिगारेटवर 2050 पासून ते 8500 पर्यंत एक्साइज ड्युटी लागेल. काही विशिष्ट प्रकारच्या सिगारेटवर हा कर 11000 पर्यंत जाऊ शकतो. सध्या 40% जीएसटी आधीच लागू आहे, त्यात आता या नव्या ड्युटीची भर पडल्याने एकूण कराचा बोजा 60 ते 70 टक्क्यांवर पोहोचणार आहे.
18 रुपयांची सिगारेट 72 रुपयांना?
तज्ज्ञांच्या मते, या कर वाढीचा थेट परिणाम किरकोळ किमतीवर होईल. सध्या जी सिगारेट 18 रुपयांना मिळते, तिची किंमत 70 ते 72 रुपयांपर्यंत जाऊ शकते. कच्च्या तंबाखूवर 60 ते 70 टक्के कर लागेल. ई-सिगारेट आणि निकोटीन उत्पादनांवर 100% कर लावला जाईल. पान मसाला आणि गुटख्यावर 'नॅशनल सिक्युरिटी सेस' देखील आकारला जाणार आहे.
बेकायदेशीर सिगारेटचा धोका वाढणार
या निर्णयामुळे काही तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. सिगारेट महागल्यामुळे लोक नशा सोडण्याऐवजी स्वस्त आणि बेकायदेशीर सिगारेटकडे वळू शकतात. भारत आधीच अवैध सिगारेटची मोठी बाजारपेठ आहे. तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, कर वाढल्याने कायदेशीर सिगारेटची मागणी घटेल, ज्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसेल.
सरकारचे मुख्य उद्दिष्ट या हानिकारक पदार्थांच्या किमती वाढवून लोकांना नशा सोडण्यासाठी प्रवृत्त करणे हे आहे. मात्र, प्रत्यक्षात लोक नशा सोडतात की आपल्या पगारातील मोठा हिस्सा धुरांत उडवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world