Cylinder Price Hike: महागाईचा भडका! LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ; 5 किलोचा 'छोटू' सिलिंडरही महागला

Commercial LPG Cylinder Price Hike: जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दिल्लीत 42 रुपये आणि कोलकात्यात 53.50 रुपयांची वाढ केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

जून महिन्याची सुरुवात सर्वसामान्यांसाठी आणि व्यापारी वर्गासाठी महागाईची ठरली आहे. आधीच सीएनजी महागलेला असताना, आता तेल वितरण कंपन्यांनी एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. 1 जून 2026 पासून सुधारित आणि नवीन दर देशभरात लागू झाले आहेत. प्रामुख्याने हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेलमधील खाण्याचे दर वाढण्याची दाट शक्यता असून, याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे.

19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरचे नवे दर

दिल्लीत कमर्शियल सिलिंडरच्या दरात 42 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आधी 3071.50 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 3113.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात सर्वाधिक म्हणजेच 53.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील जुना दर 3202 रुपयांवरून वाढून आता 3255.50 रुपयांवर पोहोचला आहे.

Advertisement

'छोटू सिलिंडर'ही महागला!

दुसऱ्या शहरांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण आणि स्थलांतरित मजूर ज्या 5 किलोच्या 'फ्री ट्रेड एलपीजी' (FTL) म्हणजेच छोटू सिलिंडरचा वापर करतात, त्यांनाही या महागाईतून सवलत मिळालेली नाही. तेल कंपन्यांनी 5 किलोच्या छोटू सिलिंडरच्या किमतीत 11 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर, दिल्लीमध्ये या छोटू सिलिंडरची किंमत 810.50 रुपयांवरून वाढून आता 821.50 रुपये झाली आहे.

commercial lpg cylinder price hike

14 किलोचा घरगुती सिलिंडर मात्र स्थिर

सर्वसामान्य कुटुंबांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, दररोज स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. घरगुती सिलिंडरचे दर पूर्वीप्रमाणेच स्थिर आहेत.

दरवाढीचं कारण काय?

जानेवारी 2026 पासून आतापर्यंत दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अनेक वेळा वाढ झाली असून तो 1691.50 रुपयांवरून 3113.50 रुपयांवर म्हणजे तब्बल १४२२ रुपयांची वाढ झाली आहे. या विक्रमी दरवाढीमागे मुख्य कारण म्हणजे इराण युद्धानंतर खाडी देश आणि मध्य-पूर्व आशियामध्ये सुरू असलेला तीव्र संघर्ष आहे. या जागतिक तणावामुळे लॉजिस्टिक्स आणि वाहतुकीमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर किमती कडाडल्या आहेत.

Topics mentioned in this article