Delhi Thar Crash: राजधानी दिल्लीतून थारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. दिल्लीतील थार शो रुममध्ये महिलेने शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून एका नवीन थारला खाली पाडले. खाली आल्यानंतर ती थार उलटली आणि तिचे एअरबॅग्स देखील उघडले. महिलेने ही थार 27 लाख रुपयांना खरेदी केली होती. अशा परिस्थितीत, सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या मोठ्या नुकसानीची भरपाई कोण करेल? हे नुकसान इन्शुरन्समध्ये समाविष्ट होईल का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत
काय घडलं होतं?
दिल्लीच्या निर्माण विहार परिसरातील ही घटना आहे. येथील एका शो रुममध्ये ही एक महिला थारची डिलिव्हरी घेण्यासाठी गेली होती. पहिल्या मजल्यावर उभ्या असलेल्या कारची पूजा केल्यानंतर लिंबू अर्पण करण्याची प्रथा पाळली गेली, पण महिलेला कारवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती लिंबासोबत शोरूमची काच फोडून खाली गेली. पहिल्या मजल्यावरून खाली पडताच कारचे एअरबॅग्स उघडले, त्यामुळे महिला आणि शोरूम कर्मचाऱ्याचा जीव वाचला. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले.
भरपाई मिळणार का?
महिंद्रा शोरूमचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर लोक एकच प्रश्न विचारत आहेत की त्या महिलेला इन्शुरन्स मिळेल का? खरं तर, महिलेने ही कार खरेदी केली होती आणि ती डिलिव्हरीसाठी शोरूममध्ये पोहोचली होती. डिलिव्हरीपूर्वीच शोरूमच्या वतीने कारचा इन्शुरन्स काढला जातो, ज्याचे पैसे कार घेणाऱ्यालाच भरावे लागतात.
आता कारचा इन्शुरन्स काही दिवसांपूर्वीच झाला असल्याने, डिलिव्हरीच्या वेळी किंवा बाहेर पडताना अपघात झाल्यास, तो इन्शुरन्समध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. थार खरेदी करणाऱ्या महिलेलाही इन्शुरन्स कंपनीकडून या नुकसानीची भरपाई मिळू शकते. नवीन कारमध्ये झिरो डेप इन्शुरन्स दिला जातो, म्हणजेच प्रत्येक लहान-मोठ्या नुकसानीचे संपूर्ण पैसे इन्शुरन्स कंपनी देते. यासाठी फक्त किरकोळ फाइल शुल्क भरावे लागते. मात्र, शोरूम त्यांच्या नुकसानीची भरपाई महिलेकडून मागू शकते.
( नक्की वाचा : EPFO News : नोकरी बदलल्यावर PF चे पैसे काढायचे की ट्रान्सफर करायचे? ही चूक केल्यास होईल मोठं नुकसान )
इन्शुरन्स कसा मिळतो?
नवीन कारचा अपघात झाल्यास, तुम्हाला ताबडतोब इन्शुरन्स कंपनीला त्याची माहिती द्यावी लागेल. तातडीनं माहिती दिल्यास जास्त त्रास होणार नाही आणि इन्शुरन्स मिळण्यास कमी वेळ लागेल. कारची दुरुस्ती कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच केली जाते आणि काही दिवस तिथेच ठेवली जाते. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये, शोरूम कर्मचारी किंवा सेल्समन लोकांना मदत करतात.