
Job Switch and EPF: एकदा लागलेली नोकरी निवृत्त होईपर्यंत करण्याचा काळ आता मागे पडत चाललाय. संपूर्ण करियरमध्ये एकपेक्षा जास्त नोकऱ्या करणे ही सामान्य गोष्ट बनली आहे. नोकरी बदलताना तुमचा पगार आणि रुटीनच बदलत नाही तर बऱ्याच गोष्टी बदलतात. तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा तुमच्या पीएफ अकाउंटचं (PF Account) काय करायचं? हा विचार तुम्ही केला आहे का? याबाबत वेगवेगळे सल्ले दिले जातात.
नोकरी बदलल्यानंतर लगेच पीएफ अकाउंटमधील पैसे काढणं योग्य आहे की ते ट्रान्सफर करणं (transfer) चांगलं आहे? या संभ्रमात अनेकजण असतात. काही जण पैशांची तात्काळ गरज असल्यामुळे पीएफमधील शिल्लक (PF Balance) रक्कम काढून घेतात. ही पद्धत योग्य आहे का? नोकरी बदलल्यानंतर पीएफचे पैसे काढल्यानंतर त्याचा पेन्शन (pension) आणि टॅक्सवर (tax) काय परिणाम होतो ? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
PF अकाउंट म्हणजे काय?
भारतातील प्रत्येक पगारदार व्यक्तीचं पीएफ अकाउंट असतं, जे EPFO म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employee Provident Fund Organisation) व्यवस्थापित करते. या अकाउंटमध्ये दर महिन्याला तुमच्या मूळ वेतनाच्या 12% रक्कम जमा होते. त्याचबरोबर कंपनीकडूनही तितकीच रक्कम जमा केली जाते. याचा अर्थ दर महिन्याला तुमच्या पगारातून आपोआप बचत होऊन पीएफ अकाऊंटमध्ये जमा होते. हेच पीएफ अकाउंट पुढे पेन्शन आणि निवृत्ती निधीसाठी (Retirement Fund) आधार ठरतं.
( नक्की वाचा : GST Council Meeting : नवरात्रीत कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! 'एवढ्या' हजारांनी स्वस्त होणार स्वप्नातील कार )
नोकरी बदलल्यावर पैसे काढण्याचे तोटे
अनेकांना वाटतं की कंपनी बदलली, तर जुनं पीएफ अकाउंट रिकामं करावं. काही लोक रोख पैशांच्या गरजेमुळेही पैसे काढून घेतात. पण असं केल्याने कंपाउंडिंगचा (Compound Interest) फायदा मिळत नाही. पीएफवर दरवर्षी व्याज मिळतं आणि तेही कंपाउंडिंगने, म्हणजे व्याजावरही व्याज मिळतं.
तुम्ही वारंवार पैसे काढले, तर निवृत्तीपर्यंत निधी खूप कमी राहील. याव्यतिरिक्त, जर तुम्ही 5 वर्षे पूर्ण होण्याआधी पैसे काढले, तर त्यावर टॅक्सही लागेल.
ही चूक कधीही करु नका
पीएफमध्ये तुमचं आणि कंपनीचं दोघांचं योगदान असतं. कंपनीच्या योगदानातून 8.33% EPS म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना (Employee Pension Scheme) मध्ये जमा होतं. तुम्ही 10 वर्षे योगदान दिलं असेल, तर तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. पण जर तुम्ही EPS चे पैसेही काढले, तर पेन्शनचा लाभ कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे EPS फंड ॲक्टिव्ह (active) ठेवणं गरजेचं आहे.
आजच्या डिजिटल युगात पीएफ अकाउंट ट्रान्सफर करणं खूप सोपं झालं आहे. UAN पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही काही क्लिकमध्ये तुमची पीएफची शिल्लक रक्कम नवीन कंपनीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकता. यामुळे तुमची शिल्लक सतत वाढत राहील, व्याजही मिळत राहील आणि निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे एक मोठी रक्कम जमा होईल.
टॅक्सचाही फायदा
EPF हा टॅक्स वाचवण्यासाठी (Tax Saving) एक उत्कृष्ट मार्ग आहे. दरवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या योगदानावरील व्याज टॅक्स फ्री (tax free) असतं. जर तुम्ही सलग 5 वर्षे पीएफमध्ये पैसे जमा केले असतील, तर काढताना टॅक्स भरावा लागणार नाही. पण जर अकाउंट 3 वर्षांपर्यंत निष्क्रिय (inactive) राहिलं, तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागेल.
थोडक्यात काय तर नोकरी बदलल्यावर पीएफचे पैसे काढणं सोपं वाटतं, पण ते तुमच्या भविष्यासाठी नुकसानदायक आहे. योग्य मार्ग हाच आहे की पीएफ अकाउंट ट्रान्सफर करावं आणि EPS फंड कायम ठेवावा, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी चांगली पेन्शन आणि मोठा निधी मिळू शकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world