भारतातील झपाट्याने बदलणाऱ्या किराणा बाजारपेठेत ब्लिंकिट (Blinkit), स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) आणि झेप्टो (Zepto) यांसारख्या 'क्विक कॉमर्स' कंपन्यांची मक्तेदारी वाढत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीचा फटका दिग्गज रिटेल साखळी 'डीमार्ट'लाही बसला आहे. वाढत्या स्पर्धेमुळे डीमार्ट चालवणाऱ्या 'एव्हेन्यू सुपरमार्ट्स'ने आपल्या 'डीमार्ट रेडी' (DMart Ready) या ऑनलाइन किराणा डिलिव्हरी आणि पिकअप सेवेचा गाशा 7 शहरांमधून गुंडाळला आहे.
11 शहरांवरच लक्ष केंद्रित
'एव्हेन्यू ई-कॉमर्स लिमिटेड'चे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ विक्रम दासू यांनी कंपनीच्या आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या तिमाहीच्या (Q1FY27) निकालांवेळी या धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली. "आम्ही आमचे बिझनेस मॉडेल सुधारत मोठ्या महानगरांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. या तिमाहीत आम्ही अशा 7 शहरांमधील ऑपरेशन्स बंद केले आहेत, ज्यांचा कंपनीच्या एकूण महसुलात अतिशय नगण्य वाटा होता. 30 जून 2026 पर्यंत आम्ही आता केवळ 11 शहरांमध्ये आमची ऑनलाइन सेवा कार्यरत ठेवली आहे," असे विक्रम दासू यांनी स्पष्ट केले. मात्र कंपनीने अधिकृतपणे या 9 शहरांची नावे किंवा ही सेवा कधी बंद करण्यात आली, याचा सविस्तर तपशील जाहीर केलेला नाही.
'लो-कॉस्ट' रणनीती विरुद्ध 'क्विक कॉमर्स'
ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट या कंपन्या सध्या शहरी बाजारपेठेत अत्यंत आक्रमकपणे पाय पसरत असून ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी बदलत आहेत. याउलट, डीमार्ट रेडी ही सेवा त्वरित वितरणाऐवजी ठराविक वेळेत मिळणारी होम डिलिव्हरी आणि जवळच्या केंद्रातून सामान स्वतः घेऊन जाणे या मॉडेलवर चालते. त्यातच डीमार्ट इतर कंपन्यांसारखे मोठे डिस्काउंट देण्याऐवजी आपल्या 'एव्हरीडे लो-कॉस्ट, एव्हरीडे लो-प्राईज' या मूळ रणनीतीवर ठाम राहिली. यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
(नक्की वाचा- Ranbir Kapoor Investment: रणबीर कपूर बनला पुणेकर! मुळशीतील 'या' गावात खरेदी केली तब्बल 25 एकर जमीन)
विशेष म्हणजे, डीमार्टचे संस्थापक आणि अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी स्वतः क्विक कॉमर्स क्षेत्रातील आपली गुंतवणूक वाढवली आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला दमानी यांनी ब्लिंकिटची मूळ कंपनी असलेल्या 'इटर्नल' (Eternal) मधील हिस्सेदारी खुल्या बाजारातील व्यवहारातून खरेदी केली होती, ज्यावरून या क्षेत्रातील वाढता गुंतवणूकदारांचा विश्वास स्पष्ट होतो.
डीमार्टच्या मूळ रिटेल व्यवसायातही संथ वाढ
कंपनीच्या ऑनलाइन व्यवसायातील या बदलासोबतच त्यांच्या प्रत्यक्ष स्टोअर्सच्या वाढीचा वेगही काहीसा मंदावल्याचे दिसून येत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल असावा यांनी सांगितले की, दोन वर्षांहून अधिक जुन्या स्टोअर्सची वाढ चालू तिमाहीत 5.5 टक्के इतकी झाली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात 7.1 टक्के होती. मोठ्या महानगरांमधील जुन्या स्टोअर्सची वाढ संथ राहिली असली तरी निमशहरी भागात मात्र डीमार्टची कामगिरी चांगली आहे. मनी कंट्रोलने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)
पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल
- एकूण महसूल: 18,343 कोटी (वार्षिक 14.1 टक्क्यांची वाढ).
- निव्वळ नफा: 936 कोटी (12.8 टक्क्यांची वाढ).
- EBITDA मार्जिन: मागील वर्षाच्या 8.2 टक्क्यांवरून किरकोळ सुधारत 8.3 टक्के झाले.
- नवीन स्टोअर्स: या तिमाहीत 3 नवीन स्टोअर्स सुरू करण्यात आले असून, देशातील एकूण स्टोअर्सची संख्या आता 503 वर पोहोचली आहे.