Ajit Ranade : पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांना पदावरुन हटवलं

अध्यापनाच्या अनुभवाशी संबंधित पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षांनंतर हटवण्यात आलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (Gokhale Institute of Politics and Economics) कुलगुरुपदावरुन प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे (Economist Dr. Ajit Ranade) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अध्यापनाच्या अनुभवाशी संबंधित पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांना अडीच वर्षांनंतर हटवण्यात आलं आहे. काही महिन्यांपासून रानडे यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. पुणे-स्थित GIPE ही भारतातील सर्वात जुनी अर्थशास्त्र संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. 

जीआयपीईचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी नेमलेल्या फॅक्ट-फाइन्डिंग पॅनेलने रानडे यांची नियुक्ती UGC च्या निकषांशी "अनुरूप" नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना पदावरून हटवलं. रानडे दोन वर्षांहून अधिक काळ नोकरीत होते. रानडे यांनी प्राध्यापक म्हणून 10 वर्षांच्या अखंड अध्यापनाच्या अनुभवाचे पात्रता निकष पूर्ण केले नाहीत असा निष्कर्ष समितीने काढला आहे. त्यातूनही त्यांना कुलगुरूपदावरुन हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

2022 मध्ये अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र रानडे या पदासाठी पात्र नाहीत, विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारला चुकीची माहिती देण्यात आली, अनावश्यक पदांची निर्मिती करुन आर्थिक गैरव्यवस्थापन झाले अशा प्रकारच्या तक्रारी युजीसीकडे करण्यात आल्यानंतर कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. रानडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्याहीवेळेस रानडे यांनी सर्व फेटाळले होते. 

हे ही वाचा - Eid-e-Milad-Un-Nabi 2024 : ईद-ए-मिलादची सोमवारची शासकीय सुट्टी रद्द; नवी तारीख जाहीर!

दरम्यान या प्रकरणात नवनियुक्त कुलपती डॉ. बिबेक देबरॉय यांनी सत्यशोधन समितीची स्थापना केली होती. या समितीच्या अनेक बैठकाही झाल्या होत्या. यानंतर समितीने रानडे यांची नियुक्ती रद्द करण्याची शिफारस केली. समितीच्या तपासणीअंतर्गत रानडे यांची उमेदवारी युजीसीने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करीत नाही.