EPFO News : कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या 7 कोटींहून अधिक सदस्यांसाठी सेवा अधिक सोप्या आणि वेगवान करण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. आता ‘पासबुक लाइट' हे नवीन फीचर सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे पीएफ खातेदारांना त्यांच्या खात्यातील शिल्लक एकाच क्लिकवर पाहता येईल. या निर्णयामुळे खातेधारकांचा वेळ वाचणार असून, तांत्रिक सोयीसुविधा वाढणार आहेत.
काय आहे निर्णय?
केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबतची घोषणा केली. ‘ईपीएफओने सदस्यांना अधिकाधिक पारदर्शक सेवा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत,' असे ते म्हणाले. या नव्या सुविधेमुळे खातेदारांना ‘ईपीएफ इंडिया'च्या युनिफाइड पोर्टलवरच त्यांचे योगदान, पैसे काढणे आणि शिल्लक यांचा संक्षिप्त तपशील मिळेल. यासाठी पासबुक पोर्टलवर वेगळे लॉगइन करण्याची गरज उरणार नाही. मात्र, सविस्तर पासबुक पूर्वीप्रमाणेच वेगळ्या पोर्टलवर उपलब्ध असेल.
( नक्की वाचा : UPI Cash Withdrawal : ATM विसरा! फक्त यूपीआयने मिळेल रोख रक्कम, QR कोडनं काढा पैसे, जाणून घ्या संपूर्ण पद्धत )
याशिवाय, पीएफ हस्तांतरणासाठी लागणारे महत्त्वाचे ‘Annexure-K' (ट्रान्सफर सर्टिफिकेट) आता थेट ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. नोकरी बदलताना अनेकदा कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अडचणी येत होत्या. मात्र, आता सदस्य स्वतः हे सर्टिफिकेट डाऊनलोड करून आपल्या खात्यातील माहितीची खात्री करू शकतील. यामुळे केवळ पारदर्शकताच वाढणार नाही, तर कर्मचारी पेन्शन योजनेसाठी (EPS) कायमस्वरूपी डिजिटल पुरावा देखील तयार होईल.
( नक्की वाचा : EPFO News : नोकरी बदलल्यावर PF चे पैसे काढायचे की ट्रान्सफर करायचे? ही चूक केल्यास होईल मोठं नुकसान )
सेवांच्या मंजुरी प्रक्रियेला गती देण्यासाठीही ईपीएफओने पाऊल उचलले आहे. आता वेगवेगळ्या दाव्यांच्या मंजुरीचे अधिकार सहाय्यक आयुक्तांना आणि त्याखालील स्तरावर सोपविण्यात आले आहेत. यामुळे दाव्यांचा निकाल जलद होणार असून, सदस्यांना चांगल्या सेवा मिळतील.