भारत 2050 पर्यंत 25 ट्रिलयन डॉलरची आर्थिक महासत्ता बनेल, असा विश्वास अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी व्यक्त केला. त्यांनी पुढील पिढीच्या नेत्यांना कल्पनाशक्ती, महत्त्वाकांक्षा आणि धैर्याने देशाच्या या महत्त्वाच्या क्षणी सहभागी होण्याचे आवाहन केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ (Indian Institute of Management, Lucknow) येथील खचाखच भरलेल्या सभागृहात बोलताना अदाणी यांनी विद्यार्थ्यांना जुन्या पद्धती सोडून देण्याचे, प्रचलित समजुतींना आव्हान देण्याचे आणि नवीन भारताच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
"तुम्ही 5 ट्रिलियन किंवा 10 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे पाहणार नाही. तुम्ही 2050 पर्यंत 25 ट्रिलियन डॉलरची महासत्ता बनणाऱ्या भारताकडे पाहाल," असे अदाणी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित तरुण श्रोत्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
21 व्या शतकातील सर्वात रोमांचक आर्थिक संधी म्हणून भारताची ओळख करून देताना अदाणी म्हणाले की, देशाची प्रगती ‘चार न थांबणाऱ्या शक्तीं'मुळे होईल. तरुण आणि महत्त्वाकांक्षी लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात देशांतर्गत मागणी, जागतिक दर्जाची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि भारतीय कल्पनांना पाठिंबा देण्यासाठी प्रथमच भारतीय भांडवलाचा उदय या त्या चार शक्ती आहेत. "नियतीचे वारे आपल्या पाठीशी आहेत," असे ते म्हणाले. तसेच, आधार, UPI आणि ONDC सारखी डिजिटल क्षेत्रात भारताने जी उभारणी केली आहे, ती इतर कोणत्याही देशाने केलेली नाही. या गोष्टी केवळ नवनिर्मिती नसून, त्या सर्वांना सामावून घेण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी एक लाँचपॅड (launchpad) आहेत, असेही ते म्हणाले.
( नक्की वाचा : 'भारतासारख्या सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, जगात कुठेही नाहीत!' गौतम अदाणींनी सांगितलं कारण )
S&P Global आणि Goldman Sachs यांसारख्या अनेक जागतिक संस्थांनी 2030 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, गौतम अदाणी यांनी 2050 पर्यंत 25 ट्रिलियन डॉलरचा जो अंदाज व्यक्त केला आहे, तो एका आघाडीच्या जागतिक उद्योगपतीने व्यक्त केलेल्या सर्वात महत्त्वाकांक्षी अंदाजांपैकी एक आहे. परंतु हा अंदाज केवळ एक आर्थिक आकडेवारी म्हणून दिला गेला नाही. अदाणी यांच्यासाठी हा एक नैतिक आणि सांस्कृतिक प्रस्ताव होता. भारताची प्रगती केवळ विस्तार किंवा उपभोग यापुरती मर्यादित नसेल, तर ती प्रतिष्ठा, संयम आणि करुणा यांसारख्या मूल्यांवर आधारित विकासाची पुनर्कल्पना असेल, असे त्यांनी सूचित केले.
त्यांचे भाषण अत्यंत वैयक्तिक होते, ज्यात धोरणात्मक दृष्टीकोन आणि स्वतःच्या अनुभवांचे मिश्रण होते. आपल्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांची आठवण करून देताना ते म्हणाले की, वयाच्या 16 व्या वर्षी मुंबईत हिऱ्यांच्या व्यापारासाठी घर सोडले, कर्ज देण्यास बँकांनी नकार दिलेल्या दलदलीच्या जमिनीवर भारतातील सर्वात मोठे बंदर (Mundra) उभारले, ऑस्ट्रेलियातील कार्मायकल कोळसा प्रकल्पावरून अनेक वर्षे विरोध आणि बदनामी सहन केली, खवडा येथे जगातील सर्वात मोठा एकल-स्थळी अक्षय ऊर्जा पार्क विकसित केला - आणि आता धारावीच्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील पुनर्विकासाचे काम हाती घेतले आहे. अदाणी यांनी प्रत्येक कामाला केवळ एक व्यवसाय म्हणून नव्हे, तर श्रद्धेचे कार्य मानले. "नकाशे तुम्हाला फक्त अशाच ठिकाणी घेऊन जातात जिथे कोणीतरी आधीच पोहोचले आहे. पण काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी, तुम्हाला नकाशाची गरज नसते. तुम्हाला एका दिशादर्शकाची (compass) गरज असते जो तुम्हाला शक्यतांकडे निर्देश करेल," असे ते म्हणाले.
अदाणी यांनी विद्यार्थ्यांना "संशयाच्या ऐवजी चारित्र्य निवडण्याचे," "सुविधेच्या ऐवजी योगदान देण्याचे," आणि "आरामाच्या ऐवजी धैर्य निवडण्याचे" आवाहन केले. सावधगिरीने धोका कमी होऊ शकतो, पण त्यामुळे भविष्य घडवता येत नाही, असे ते म्हणाले. "भारताला अशी चित्रे काढणारे लोक नको आहेत जे फक्त रिकाम्या जागा भरतात. भारताला असे लोक हवे आहेत जे कॅनव्हासवरच प्रश्न विचारू शकतील. जे अजून कल्पनाही न केलेल्या रंगांनी चित्र काढू शकतील."
त्यांच्या आवाहनाला सांस्कृतिक संदर्भही होता. अनेक भारतीयांनी परदेशात मोठे यश मिळवले आहे हे मान्य करताना, ते म्हणाले की, आता भारतीय स्वप्नांना भारतीय भूमीवरच पूर्णत्वास आणण्याची वेळ आली आहे. "भारतासाठी. भारतात. भारतासोबत," असे ते म्हणाले "तुमचा प्रवास हा या गोष्टीचा पुरावा असू द्या की भारतीय मातीत रुजलेली स्वप्ने जागतिक उंची गाठू शकतात." असं आवाहन त्यांनी भाषणाच्या शेवटी केले.